सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन; महापालिकेतील भोंगळ कारभाराचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 12:53 AM2020-12-01T00:53:31+5:302020-12-01T00:53:51+5:30
राष्ट्रवादीचे बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविरोधात आंदोलन, ठामपाचा निषेध : प्रशासनाचे वेधले लक्ष
मुंब्रा : ठामपा हद्दीमध्ये ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना बघून घाबरू नका. ते बंद आहेत. महापालिका सुस्त, ठेकेदार मस्त, असे फलक लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी मुंब्य्रात अनोखे आंदोलन केले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अशरफ तथा पक्षाचे युवाध्यक्ष पठाण यांनी बंद असलेल्या कॅमेऱ्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.
ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर बसवलेले हे कॅमेरे सध्या बंद आहेत. प्रभाग सुधारणा निधीतून १२०० आणि वायफाय योजनेतून १०० असे एकूण १,३०० तसेच अन्य निधीतून १०० कॅमेरे बसविले आहेत. याशिवाय, ३०० ते ४०० कॅमेरे आणखी बसविण्यात येणार होते. यामुळे रस्त्यांवर घडणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्हेगारीला आळा बसेल, या हेतूने ही योजना राबविली होती. या योजनेंतर्गत बसविलेले शहरातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुंब्रा-कौसा आणि दिव्यातील १०० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा दावा पठाण यांनी केला. याबाबत ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाशी संपर्क साधल्यानंतरही त्यावर कार्यवाही होत नसल्याने संतप्त होऊन त्यांनी हे आंदोलन केले.
गुन्हा घडल्यास छडा कसा लावणार?
एकीकडे गुन्हे वाढू नये, अशी अपेक्षा करीत असतानाच दुसरीकडे गुन्हेगारांना मोकळे सोडण्याचे हे धोरण आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. नुकत्याच राबोडीत झालेल्या हत्येची उकल करण्यासाठी तेथे लावलेल्या कॅमे-यांचा वापर झाला. त्यामुळे आरोपींना पकडणे सोपे झाले. कॅमेरे बंद असलेल्या ठिकाणी एखादा गुन्हा घडल्यास त्याचा छडा कसा लावणार, असा सवाल करून लावण्यात आलेले कॅमेरे आठ दिवसांत सुरू न केल्यास ते विद्युत विभागाच्या ठिकाणी फेकण्यात येतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.