इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यात बैलगाडी आंदोलन; महिलांकडून चुलीवर स्वयंपाक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 03:37 PM2021-07-03T15:37:01+5:302021-07-03T15:51:46+5:30
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.
ठाणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली असून शहरात बैलगाडी आंदोलन छेडत महिलांनी शासकीय विश्रामगृहाजवळ चुली पेटवून त्यावर स्वयंपाक केला. तर तरुणांनी सायकल चालवून केंद्रीतील मोदी सरकारचा निषेध केला. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश सचिव सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांच्या बाहेर शासकीय विश्रामगृहाजवळ हे अनोखे आंदोलन शनिवारी पार पडले.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.यामुळे या दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणार्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही प्रचंड वाढलेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी 'मोदी फेकतो डोळ्यात धूळ - रिकामे सिलिंडर पेटते चूल'; 'तेल का खेल - मोदी सरकार फेल'; भाजप की नियत झुटी है - महंगाई फिर से लौटी है' ; 'सिलिंडर हुआ 800 पार - कहाँ हो मोदी सरकार'; 'हर रोज किंमत बढाओगे - अच्छे दिन कब लाओगे'; वाह रे मोदी तेरा खेल - महंगा डिझेल- महँगा तेल; मोदी सरकार मुर्दाबाद आदी घोषणा देऊन केद्र शासनाच्या कारभाराचा पाढाच वाचला.
महिलांनी यावेळी चूल पेटवून भाकर्या भाजल्या. काही कार्यकर्त्यांनी मोदींचे मुखवटे घालून रिकामा सिलिंडर उचलून तर शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी बैलगाडी हाकून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी परांजपे म्हणाले की, गेल्या महिनाभरात 790 रुपये असणारा सिलिंडर 834.50 रुपये एवढा महाग झाला आहे. याचा महिलांनी निषेध चूल पेटवून केला आहे. ठाण्यात सध्या पेट्रोलचा दर 105 रुपये झाला आहे. त्यामुळे युवक आणि युवतींनी सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला आहे. तर, आता बैलगाडी कार पेक्षा बैलगाड्याच चालवाव्या लागतील, असा संदेश देऊन आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी कृतीतून मोदी सरकारचा निषेध केला आहे.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं ठाण्यात आंदोलन, मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी @NcpThane@NCPspeakspic.twitter.com/PdNhccIuIA
— Lokmat (@MiLOKMAT) July 3, 2021
मोदी सरकार हे सामान्यांना लुटण्यासाठी आहे. एकीकडे कोरोनाची महामारी असताना, बेरोजगारी वाढलेली असताना, इंधनाचे दर प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळेच आम्ही मोदी सरकारचा निषेध करीत आहोत. जनतेच्या मनातील रोष ओळखून आता तरी मोदी सरकारने इंधनाच्या दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. जर इंधनाचे दर कमी केले नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही परांजपे यांनी दिला. या आंदोलनात महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, यांच्यासह सुरेखा पाटील, प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.