राष्ट्रवादी काँग्रेसचे आगरीकार्ड चाललेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 12:51 AM2019-05-30T00:51:43+5:302019-05-30T00:51:57+5:30

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना आगरी समाजाकडून जास्त मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती.

NCP's agri card is not going on | राष्ट्रवादी काँग्रेसचे आगरीकार्ड चाललेच नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे आगरीकार्ड चाललेच नाही

Next

- मुरलीधर भवार
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना आगरी समाजाकडून जास्त मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. निवडणुकीच्या प्रचारात आगरी समाज हा १९७९ पासून शिवसेना-भाजप युतीच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, असा दावा युतीकडून केला जात होता. अखेरीस तोच दावा या निवडणुकीत खरा ठरला. या मतदारसंघात युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना एक लाख २६ हजार मते मिळाली. राष्ट्रवादीने फेकलेले आगरीकार्ड हे निष्प्रभ ठरल्याने आगरी समाजाने युतीच्या उमेदवाराला पसंती देत भरभरून मतदान केले. कल्याण ग्रामीण भागात शिवसेनेचे मताधिक्य वाढले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून २० हजार ८३० मते मिळाली होती. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना ४३ हजार ८६३ मते मिळाली. राष्ट्रवादीचे मताधिक्य दुपटीने वाढले आहे. जवळपास २३ हजार मते बाबाजींना अधिक मिळाली आहेत. ही सगळीच मते राष्ट्रवादीची नाहीत. मनसेने बाबाजींसाठी काम केले होते. त्यामुळे वाढलेले मताधिक्य हे मनसेमुळे मिळालेले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना ३१ हजार ४६४ मते कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मिळाली होती. मनसेची साथ राष्ट्रवादीला मिळाली, असे म्हटले तरी मनसेच्या मागच्या मताच्या आकडेवारीनुसार मनसेचे मताधिक्य घटलेले आहे. अन्यथा, बाबाजींना ३१ हजार मते अधिकची मिळणे अपेक्षित होते. यावेळच्या निवडणुकीत मनसे रिंगणात नव्हती; मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आठ हजार ९१ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव कल्याण ग्रामीणमध्ये फारसा दिसून आलेला नाही.
बाबाजी पाटील यांनी त्यांना आगरी समाजाची व महिला बचत गटांची मते मिळतील, असा दावा केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आगरी समाजाने पुन्हा विचार करावा, असे आवाहन केले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आगरीकार्ड चालवण्याच्या उद्देशाने पाटील यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर सभेत मान्य केले. कल्याण ग्रामीणमध्ये प्रीमिअर ग्राउंडवर पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेचाही पाटील यांना काहीएक उपयोग झाला नाही. विशेष म्हणजे २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीने २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन देऊन त्याची पूर्तता न केल्याने शिवसेना-भाजपच्या उमेदवारास मतदान करू नये, असे जाहीर आवाहन केले होते. समितीच्या या आवाहनाला कोणी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे समितीचे आवाहनही निष्प्रभ ठरले.
याउलट, डॉ. शिंदे यांनी २७ गावांत केवळ प्रचारयात्रा केल्या होत्या. त्याठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांची जाहीर सभा झाली नाही. त्यांनी केवळ केलेल्या विकासकामांचा प्रचार केला. तसेच १९७९ पासून आगरी समाज हा युतीच्या पाठीशी उभा राहिला असल्याचे दाखले देत यावेळेसही हा समाज युतीला अनुकूल असणार, असा दावा युतीच्या नेत्यांकडून केला जात होता.
तोच दावा सार्थ ठरला. समाजाने युतीला भरभरून मतदान केले. शिंदे यांना २०१४ मध्ये कल्याण ग्रामीणमधून ८७ हजार ९२७ मते मिळाली होती. २०१९ मध्ये शिंदे यांना याच भागातून एक लाख २६ हजार ६०७ मते मिळाली. यावेळेस शिंदे यांना या भागातून ३८ हजार मते जास्तीची मिळाली. मताधिक्य वाढले म्हणजे त्यांनी केलेल्या कामांना ग्रामीण भागातील मतदारांनी पसंती दिली आहे.
>की फॅक्टर काय ठरला?
स्थानिक आमदार सुभाष भोईर शिवसेनेचे आहेत. २७ गावांत रस्ते विकासकामांसाठी १०२ कोटींचा निधी शिंदे यांनी एमएमआरडीएकडून मंजूर केला आहे. नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांपैकी नागाव हे खासदारांनी दत्तक घेतले. त्याठिकाणचा तलाव विकसित केला आहे. नेवाळी शेतकरी आंदोलनात गुन्हे दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार शिंदे ठाम उभे राहिले. निवडणूक काळात आगरी मेळावा आयोजित केला गेला.
>विधानसभेवर काय परिणाम
राष्ट्रवादीकडून निवडणुकीत जातीपातीचे कार्ड चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या जातीपातीच्या राजकारणाला मतदारांनी फाटा दिला आहे. पुन्हा शिवसेना-भाजप युतीला पसंती दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचाच उमेदवार या मतदारसंघातून निवडून येणार, हे लोकसभेच्या मताधिक्यावरून तरी स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेचा विधानसभेचा मार्ग सुकर होऊ शकतो.

Web Title: NCP's agri card is not going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.