ठाण्यात भाजपा सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन, शेकडो कार्यकर्ते, फेरीवाले सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 05:07 PM2017-11-27T17:07:20+5:302017-11-27T17:10:20+5:30
भाजप सरकराच्या विरोधात सोमवारी शहर राष्ट्रवादीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो पदाधिकारी, फेरीवाले सहभागी झाले होते.
ठाणे - महागाई, शेतकरी आत्महत्या, मराठा- धनगर- मुस्लीम आरक्षण आदी सर्वच आघाड्यांवर या सरकारने जनतेची पिळवणूकच केली आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. तीन वर्षे शांततेत गेली असतानाच आता सर्वच घटकांची पिळवून या सरकारकडून केली जात आहे. त्यामुळेच आता भाजप- सेनेच्या सरकारच्या पापाचा घडा भरला असून त्यांना जनता धडा शिकवेल, अशी टिका यावेळी आव्हाड यांनी केली.
राज्य सरकारने २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यात कमालीची दिरंगाई होत आहे. त्यासोबतच बेरोजगारी, नागरी भागातील प्रश्न सोडवण्यास सरकारला अपयशच आले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे; आरक्षणाच्या मुद्यावर सरकारकडून दिशाभूल केली जात आहे, आदी मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ठाण्यात हा मोर्चा काढण्यात आला. गडकरी रंगायतनपासून सुरु झालेला हा मोर्चा मासुंदा तलावाला वळसा घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या फेरीवाले, पोतराजांनी आत्मक्लेश करु न सरकारचा निषेध केला. तसेच, या मोर्चात हातगाडीवर भाज्या ठेऊन महागाईचाही निषेध करण्यात आला.