इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बैलगाडी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:54+5:302021-07-04T04:26:54+5:30
ठाणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली असून, शहरात बैलगाडी आंदोलन केले. तर ...
ठाणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात येथील राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली असून, शहरात बैलगाडी आंदोलन केले. तर महिलांनी शासकीय विश्रामगृहाजवळ चुलीवर स्वयंपाक करून तर तरुणांनी सायकल चालवून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला.
गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश सचिव सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांच्या बाहेर शासकीय विश्रामगृहाजवळ हे आंदोलन शनिवारी पार पडले.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे या दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणार्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यातच गॅस सिलिंडरचे दरही प्रचंड वाढलेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ''मोदी फेकतो डोळ्यात धूळ-रिकामे सिलिंडर पेटते चूल''; ''तेल का खेल-मोदी सरकार फेल''; भाजप की नियत झुटी है- महंगाई फिर से लौटी है''; ''सिलिंडर हुआ-८०० पार-कहाँ हो मोदी सरकार''; ''हर रोज किंमत बढाओगे-अच्छे दिन कब लाओगे''; वाह रे मोदी तेरा खेल - महंगा डिझेल- महँगा तेल; मोदी सरकार मुर्दाबाद आदी घोषणा देऊन केंद्र शासनाच्या कारभाराचा पाढाच वाचला.
या आंदोलनात महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांच्यासह सुरेखा पाटील, प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
..................