कळवा-मुंब्य्रासाठी राष्ट्रवादीत चुरस
By admin | Published: January 19, 2017 04:02 AM2017-01-19T04:02:26+5:302017-01-19T22:57:30+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असे काँग्रेसचे प्रभारी नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी जाहीर केले
जितेंद्र कालेकर,
ठाणे- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असे काँग्रेसचे प्रभारी नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी जाहीर केले असले तरी कळवा मुंब्रा भागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वबळावर लढण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे एकेका प्रभागासाठी अनेकांनी मुलाखती देऊन नेत्यांसमोर पेच निर्माण केला आहे.
येथील एका खासगी हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी १० ते ११ प्रभाग १ ते ५, त्यानंतर ११ ते १२ वा. च्या दरम्यान ६ ते ११ प्रभागांचे त्यानंतर इतर प्रभागांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात विद्यमान नगरसेवकांनीही पुन्हा आपले नशीब अजमविण्यासाठी पार्लिमेंटरी बोर्डाससमोर मुलाखती दिल्या. सर्वाधिक गर्दी होती ती कळवा आणि मुंब्रा भागातूनच.
कळव्याच्या प्रभाग क्रमांक ३१ या संजयनगर, कोळीवाडा या ३१ क आणि ब मध्ये अलिकडेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले राजन आणि अनिता किणे या नगरसेवक दाम्पत्यासह राजन यांचे भाऊ मोरेश्वर, नगरसेवक महेंद्र कोमुर्लेकर असे ११ जण इच्छुकांच्या रांगेत आहेत. तर ३१ ब या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागात अनिता किणे आणि रेश्मा पाटील यांच्यासह आठ महिलांनी मुलाखती दिल्या. ३१ अ मध्ये मात्र अवघ्या दोन महिलांनी प्रतिसाद दिला. प्रभाग ३२ ब मध्ये तीन महिला, क मध्ये ७ आणि ड मध्ये आठ जणआपले नशिब अजमविण्यास इच्छुक आहेत. अशीच परिस्थिती चर्नीपाडा प्रभाग ३३ ब, क आणि ड मध्ये आहे.
ब हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने तिथे ५, ब मध्ये ४ महिला उमेदवारांनी तयारी दर्शविली आहे. तर ड मध्ये पाच जण उत्सुक आहेत. किस्मत कॉलनी या प्रभाग ३० मध्ये विद्यमान नगरसेवक सिराज डोंगरे यांच्यासह आठ जणांना निवडणूक लढवायची आहे. याशिवाय, ३०-अ आणि ब मध्ये प्रत्येकी तीन तर ३०-ड मध्ये चौघांनी मुलाखत दिली.
शीळ डायघर येथील इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा बळी गेल्यानंतर अटक झालेले नगरसेवक हिरा पाटील आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्यासह तिघांनी २९ अ साठी तयारी दर्शविली. २९- ब मध्ये एकमेव महिला असून २९-क मध्येही तीन महिला आहेत. प्रभाग २५ क आणि ड मध्येही प्रत्येकी पाच जणांनी मोर्चेबांधणी केली. विटाव्याच्या प्रभाग २४ अ, क आणि ड या तीन जागांसाठीही अनुक्रमे चार, सहा आणि आठ जण इच्छुकांच्या रांगेत होते.
>विद्यमान नगरसेवकांसाठी इच्छुकांची माघार
प्रभाग एक ते आठ मध्ये घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, शास्त्रीनगरसाठी प्रत्येकी एक ते तीन इच्छुक होते. शहरातील करवालोनगर किसननगर वगळता सर्वच प्रभागांमध्ये एक किंवा दोघेच इच्छुकांच्या रांगेत होते. एकेका प्रभागासाठी अनेकांनी मुलाखती देऊन नेत्यांसमोर पेच निर्माण केला आहे. अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवकांसाठी इच्छुकांनी आपल्या इच्छेवर पाणी सोडल्याचे चित्र पहायला मिळाले.