महापालिका बरखास्त करण्याची राष्ट्रवादीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:27 PM2019-05-20T17:27:49+5:302019-05-20T17:32:29+5:30

स्थायी समिती सदस्यांची निवड चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याच्या विरोधात राष्ट्रवादीने आवाज उठविला आहे. या विरोधात आता न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तर महापालिका बरखास्त करतांनाच उपमहापौरांचे पदही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

NCP's demand for sacking of municipal corporation | महापालिका बरखास्त करण्याची राष्ट्रवादीची मागणी

महापालिका बरखास्त करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next
ठळक मुद्देउपमहापौरांचे पद रद्द कराप्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले

ठाणे - स्थायी समितीमध्ये पुन्हा सत्ताधारी शिवसेनेने चुकीच्या पध्दतीने सदस्यांची निवड केली आहे. यामध्ये भाजपने सुध्दा त्यांना साथ दिली आहे. परंतु हे केवळ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच जाणून बुजुन ही निवड करण्यात येऊन यातून केवळ निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी आखला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच या निवडीबाबत उपमहापौरांनीसुध्दा आक्षेप घेतला नसल्याने त्यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागील २०१२ पासून शिवसेनेकडून अशा पध्दतीने चुकीचा कारभार केला जात असल्याने महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणीही शासनाकडे केली जाणार असून याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
              ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते. स्थायी समिती सदस्यांची निवड मागील आठवड्यात करण्यात आली. परंतु शिवसेनेने पुन्हा चुकीच्या पध्दतीने ही निवड केली असल्याचा आरोप करीत यामध्ये प्रशासनसुध्दा सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. २०१२ पासून सत्ताधारी चुकीच्या पध्दतीने कायद्याची पायमल्ली करीत असून शासनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता ज्या पध्दतीने स्थायी समिती गठीत करण्यात आली आहे, त्याविरोधात आम्ही आवाज उठविणार हे सुध्दा सत्ताधाऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे स्थायी समितीचे घोंगडे भिजत ठेवून सर्व प्रस्ताव महासभेच्या पटलावर नेऊन तेसुध्दा गाई गडबडीत, गोंधळात मंजुर करण्याचा घाट टेंभी नाक्यावरील आदेशावरुन केला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे स्थायीचा जो चुकीचा ठराव झालेला आहे, तो मंजूर करायचा की नाही, याबाबतची भुमिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना घ्यायची असून त्यांनी सत्ताधाऱ्यांचा हा डाव उधळून लावला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान स्थायी समिती सदस्यांची निवड करतांना, उपमहापौरांनी चुकीच्या पध्दतीने नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात यावे आणि सत्ताधाऱ्यांकडून जी काही कायद्याची पायमल्ली केली जात आहे, त्यानुसार महापालिकाच बरखास्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



 

Web Title: NCP's demand for sacking of municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.