आयुक्त जयस्वाल यांच्याबाबत राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:21 AM2018-10-30T00:21:28+5:302018-10-30T00:21:53+5:30
आ. आव्हाड यांचे पाठिंब्याचे पत्र; शहर राष्ट्रवादीकडून आरोप, आंदोलने
ठाणे : ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून लक्ष्य करत असताना त्याच पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांची पाठराखण केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दुटप्पी भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीमधील बेबनावाचा हा परिपाक आहे की, संभ्रम निर्माण करण्याची खेळी आहे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
दोन ते तीन महिन्यांपासून ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असून त्यामागे राष्ट्रवादीचा मोठा वाटा राहिला आहे. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी शहरातील थीम पार्क आणि बॉलिवूड पार्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी मुल्ला आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली होती. त्यानंतर, २६ आॅक्टोबर रोजी या थीम पार्कचा पाहणी दौरा करून यामध्ये १०० टक्के भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. हिरानंदानी इस्टेट भागातील मलनि:सारण प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावावरूनही याच महासभेत मुल्ला आणि पाटील यांनी आवाज उठवला होता. २५ आॅक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते पाटील आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी हा ३० एकरांचा भूखंड ताब्यात घेण्याची मागणी करत सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता. २० आॅक्टोबरच्या महासभेत परिवहनसेवेमार्फत १५० बसेस दुरुस्तीचा प्रस्ताव होता. या प्रस्तावानुसार बसगाड्या दुरुस्त करून त्या जीसीसी तत्त्वावर खाजगी ठेकेदाराला चालवण्यासाठी दिल्या जाणार आहेत. यातून ठेकेदाराला पुढील पाच वर्षांत ४५७ कोटींचा नफा होणार आहे. याला विरोध करत त्याविरोधात आवाज फोडण्याचे कामही मुल्ला यांनी केले होते. त्यानंतर, याच भ्रष्टाचाराविरोधात २२ आॅक्टोबर रोजी शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी वागळे आगारात आंदोलन केले होते.
दरम्यान, एखादा प्रस्ताव तयार करत असताना तो सत्ताधाºयांच्या माध्यमातून किंवा प्रशासन स्वत: पटलावर आणत असतो. त्यामुळे यात दोघेही तसे दोषी आहेत. एकीकडे राष्टÑवादीतील ही मंडळी आंदोलन करत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचले जात असून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. यामध्ये सामाजिक व्यक्तींबरोबर काही राजकीय मंडळींचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. साहजिकच, आव्हाड यांचा रोख स्वपक्षीय मंडळींकडे आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
राष्ट्रवादीत आयुक्तांवरून मतमतांतरे
शहर विकासाच्या दृष्टीने संजीव जयस्वाल यांनी चांगली कामे केली आहेत. त्यामुळेच हा पत्रव्यवहार केला. आंदोलनाला माझा कोणताही विरोध नाही. परंतु, आयुक्तांनी विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. - जितेंद्र आव्हाड,
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
/>
विकासाच्या मुद्यावर आम्ही सर्व आयुक्तांच्या बाजूने आहोत. परंतु, इतर विषयांवर काहीही भाष्य करू शकत नाही.
- मिलिंद पाटील,
विरोधी पक्षनेते, ठामपा
आयुक्त संजीव जयस्वाल हे नसतानासुद्धा शहराचा विकास झालेला आहे. ते गेल्यानंतरही शहराचा विकास होणारच आहे. जयस्वाल हे जरी स्वच्छ प्रतिमेचे असले तरीसुद्धा त्यांच्या हाताखालील अधिकाºयांकडून जो भ्रष्टाचार झालेला आहे, तो रोखण्यात अपयशी कोण ठरले, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.
- आनंद परांजपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस