राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची घोषणा

By admin | Published: January 22, 2017 05:05 AM2017-01-22T05:05:02+5:302017-01-22T05:05:02+5:30

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट संकेत माजी मंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी दिल्याने उल्हासनगरात या पक्षाचे

NCP's 'Ekla Chalo Re' Declaration of NCP | राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एकला चलो रे’ची घोषणा

Next

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे स्पष्ट संकेत माजी मंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी दिल्याने उल्हासनगरात या पक्षाचे ‘एकला चलो रे’ हेच ब्रीद असल्याचे स्पष्ट झाले. सर्वच्या सर्व ७८ जागा लढवायला निघालेला राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ओमी कलानी यांच्या जोरावर हे शिवधनुष्य उचलायला निघाला आहे, त्यांची भाजपाच्या एका गटासोबत छुपी युती करण्याकरिता नेत्रपल्लवी सुरू आहे. अर्थात, ओमी हे पक्षाचा एक भाग आहेत, असे मत खुद्द नाईक यांनी व्यक्त केले आहे.
उल्हासनगरातील पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गणेश नाईक, पक्षाचे निरीक्षक सुधाकर वढे, प्रमोद हिंदुराव, ओमी कलानी, ज्योती कलानी यांच्या उपस्थितीत झाल्या. सर्वच प्रभागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कार्यालयात एकच गर्दी झाली होती. तब्बल २८० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहर जिल्हाध्यक्ष आमदार ज्योती कलानी यांनी निरीक्षक सुधाकर वढे व संजीव नाईक यांच्या उपस्थितीत गोवा कार्यकर्ता शिबिरात ४८ उमेदवार जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारीला मुलाखतीनंतर धक्का बसणार नसल्याचे सांगून अपवादात्मक बदल करण्याचे सर्वाधिकार ज्योती कलानी यांना दिल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
ओमी कलानी यांच्या प्रवेशाकरिता भाजपाने गळ टाकला असला, तरी ओमी हे पक्षाचाच एक भाग असून ते पक्षाच्या युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. काँग्रेस पक्षाकडून उल्हासनगरात आघाडी करण्याबाबत प्रस्ताव आलेला नाही. तसेच आम्हीही त्यांना प्रस्ताव पाठवला नसल्याने आघाडी होणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले. यापुढे आघाडीचा प्रस्ताव आल्यास त्याचा तपशील पाहून विचार करू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राष्ट्रवादी सर्वच्या सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे करून पालिकेची पूर्ण सत्ता काबीज करणार असल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)

भाजपासोबत छुपा समझोता
उल्हासनगरात सत्ता हस्तगत करण्याकरिता भाजपासोबत हातमिळवणी करणे अपरिहार्य असल्याचे ज्योती कलानी यांचे समर्थक सांगत होते.
भाजपाची ८० टक्के कार्यकारिणी ही ओमी यांच्यासोबत समझोता करण्याच्या बाजूची आहे, असे ते सांगत होते.
याच गटासोबत कलानी यांच्या चर्चा सुरू असून परस्परांच्या कोणत्या जागांवर उमेदवार द्यायचे नाही किंवा कमकुवत उमेदवार द्यायचे, याच्या वाटाघाटी सुरू असून दोन दिवसांत त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: NCP's 'Ekla Chalo Re' Declaration of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.