कल्याण पश्चिमेवर राष्ट्रवादीचाही डोळा, काँग्रेसकडून मात्र उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:49 AM2019-10-03T00:49:33+5:302019-10-03T00:49:57+5:30
जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात कोण उमेदवार उभे करणार, याबाबतचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात आहेत.
कल्याण : जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात कोण उमेदवार उभे करणार, याबाबतचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात आहेत. काँगे्रसने उमेदवार घोषित केला असला तरी, राष्ट्रवादीने कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी फिल्डिंग लावली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते हे पश्चिम व कल्याण पूर्व मतदारसंघातून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वरिष्ठांनी तसे आदेश दिल्याचा दावा हनुमंते यांनी केला आहे.
काँग्रेसने बुधवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर केली. यात कल्याण पश्चिममधून कांचन कुलकर्णी, तर डोंबिवलीतून राधिका गुप्ते यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण ग्रामीण आणि पूर्व मतदारसंघांतील उमेदवारांची नावे काँग्रेसच्या यादीत नसल्याने हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याचे बोलले जात आहे. परंतु, राष्ट्रवादीने या मतदारसंघांसाठी उमेदवार घोषित केलेले नाहीत. हनुमंते यांनी कल्याण पश्चिमसाठी आधीपासूनच फिल्डिंग लावली होती. परंतु, तो काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने ते नाराज झाल्याची चर्चा असून, त्यांनी पश्चिमसह पूर्व मतदारसंघात गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे.
आघाडीत काही जागांवरून तिढा असल्याने पक्षाच्या आदेशानुसारच उमेदवारी अर्ज दाखल करीत असल्याचे हनुमंते यांनी सांगितले.
आघाडीचा धर्म त्यांनी पाळावा
आघाडीतील जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली असे दोन मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व आणि ग्रामीणला राष्ट्रवादीने उमेदवार द्यावेत. रमेश हनुमंते यांना त्यांच्या पक्षाने काय आदेश दिले, याची कल्पना नाही. परंतु, आघाडीत निवडणूक लढवताना त्यांनी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले.