मनसेच्या मतांसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग; राज ठाकरे ठाण्यात सभा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:06 AM2019-03-28T00:06:18+5:302019-03-28T00:06:37+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी मोदी आणि भाजपाविरोधात प्रचार करण्याची भूमिका पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
- अजित मांडके
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी मोदी आणि भाजपाविरोधात प्रचार करण्याची भूमिका पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळेच ठाणे लोकसभा मतदार संघात मनसेची मते आता निर्णायक ठरणार आहेत. ठाण्यात मनसेचा एकही नगरसेवक नसला तरी त्यांची पारंपारिक अशी सुमारे एक लाखाच्या आसपास मते आहेत. ती आपल्याकडे वळविण्यासाठी राष्टÑवादी जोरदार प्रयत्न करीत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच निवडणुकीच्या अंतिम टप्यात राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार असून त्याचा फायदा घेण्यासाठीसुद्धा राष्टÑवादीने आतापासूनच कंबर कसली आहे.
मोदींविरोधात राज्यभर सभा घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार राष्टÑवादीने आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास मनसेच्या अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती. त्यामुळे ती निर्णायक ठरणार आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठाणे शहर विधानसभेतून निलेश चव्हाण यांना ८ हजार ३८१ मते मिळाली होती. परंतु, आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून सेजल कदम यांना ८ हजार ५७८ मते मिळाली होती. तर ओवळा माजिवडा मतदासंघातून सुधाकर चव्हाण यांना २० हजार ५६८ मते मिळाली होती. ठाण्यात मनसेचा तसा बऱ्यापैकी बोलबाला आहे. परंतु, नवी मुंबईत त्यांची फारशी ताकद दिसून आलेली नाही. ऐरोली विधानसभा मतदासंघातून गजानन खाबळे यांना अवघी ४ हजार १११ मते मिळाली होती. तर बेलापूर मधून गजानन काळे यांना ४ हजार १९३ मते मिळाली होती. तर मीरा भाईंदरमध्ये मनसेने आपला उमेदवार दिला नव्हता.
दरम्यान त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची चांगलीच घसरण झाल्याचे दिसून आले. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तर भोपाळाही फोडता आला नाही. हीच परिस्थिती नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्येही दिसून आली. परंतु, आता राज ठाकरे यांनी मोदी विरोधी धोरण अवंलबविल्याने त्याचा फायदा आपल्याला कसा होईल, यासाठी राष्टÑवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. धूळवडीच्या दिवशीच राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना रंग लावून आपला रंग एकच असल्याचे दाखवून दिले. मनसेची आताच्या घडीला या मतदारसंघात अंदाजे एक लाखांच्या आसपास मते असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
व्यासपीठावर राहणार फक्त ठाकरे
ठाणे लोकसभा मतदारसंघात मनसेची एक लाखाच्या जवळपास मतं आहेत. ही गठ्ठा मतं निवडणुकीचा निकाल नक्कीच बदलू शकतात. त्यामुळे ही मते आपल्याकडे वळविण्यासाठी राष्टÑवादीने जोरदार प्रयत्न सुरूकेले आहेत. अशातच प्रचाराच्या अंतिम टप्यात राज ठाकरे यांची ठाण्यात सभा घेण्यासाठी मनसेचेच काही पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेचा फायदा अर्थातच राष्ट्रवादीला होणार असल्याने त्यांनीही कंबर कसली आहे.
राज ठाकरेंची सभा लागल्यास व्यासपीठावर राष्टÑवादीची मंडळी असणार का, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु, ही सभा केवळ राज ठाकरे घेणार असून ती मोदीविरोधी असणार आहे. शिवाय व्यासपीठावर इतर पक्षातील कोणीही नसेल, अशी माहिती मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. व्यासपीठावर इतर पक्षातील कोणी नसला तरी राज यांच्या येण्याचा फायदा उठविण्यासाठी राष्टÑवादीने कंबर कसली आहे.