कल्याण पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, सभापतीपदी दर्शना जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:41 AM2018-01-09T02:41:39+5:302018-01-09T02:41:45+5:30
कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव सभापती झाल्या. उपसभापतीपदी भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले.
कल्याण : कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव सभापती झाल्या. उपसभापतीपदी भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले.
पंचायतीच्या १२ जागांपैकी भाजपाकडे पाच, राष्ट्रवादीकडे तीन आणि शिवसेनेकडे चार जागा होत्या. निवडणूक लढवताना शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवसेनेला सभापतीपद, तर राष्ट्रवादीला उपसभापतीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी भाजपाला समर्थन दिले. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या जाधव, भाऊ गोंधळी यांनी अर्ज भरला होता. उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या भरत भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गोंधळे यांना शिवसेनेचे समर्थन मिळणार होते. मात्र शिवसेनेची चार व गोंधळे यांचे एक मत अशी पाचच मते गोंधळी यांना पडली. भाजपाच्या पाठिंब्यावर सात मतांनी जाधव सभापतीपदी निवडून आल्या आणि सात मतांनी भाजपाचे म्हात्रे उपसभापतीपदी निवडून आले. सभापतीपदाचा अर्ज गोंधळी यांनी दाखल केला, तेव्हा शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपच्या गळाला लागल्याचे कळताच लांडगे तेथून निघाले. सभापती जाधव यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय एकटीचा नसून कार्यकर्त्यांनी दिलेल्या कलानुसार निर्णय घेतल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी सांगितल, राष्ट्रवादीची शिवसेनेशी बांधिलकी निवडणुकीपुरतीच होती. पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असे संकेत पक्षाच्या वरिष्ठांकडून मिळाल्याने महिलेला सभापती पदाचा मान दिला. याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणावर होणार का, असे विचारता परिणाम होणार हे नक्की असे त्यांनी सांगितले.
भाजपाचे कल्याण तालुकाध्यक्ष चंदू गोष्टे यांनी सांगितले, राजकारण बाजूला ठेवून भाजपाने राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. ही युती स्थानिक पातळीवर आहे. विकासासाठी आम्ही कमीपणा घेऊन उपसभापतीपद घेतले, तरी विजय भाजपाचाच झाला.
कथोरेंचे डावपेच यशस्वी
कल्याण पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची युती असताना भाजपाला पाचच जागा मिळाल्या असतानाही युती फोडून राष्ट्रवादीचे दोन सदस्य आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपा आमदार किसन कथोरे यशस्वी झाले. त्यामुळेच पंचायत समितीच्या सत्तेपासून शिवसेनेला दूर ठेवणे शक्य झाले.