भिवंडीत टोरंटो कंपनीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 03:22 AM2018-10-04T03:22:37+5:302018-10-04T03:23:00+5:30
राज्य सरकारने २००७ मध्ये टोरंटो कंपनीस शहरात वीजपुरवठा करणे आणि वीजबिलवसुलीसाठी फ्रेन्चायसी दिली. शहरात वीजचोरीचे प्रमाण वाढून वीजथकबाकी वाढल्याने
भिवंडी : राज्य सरकारने शहरातील वीजपुरवठा आणि वीजबिलवसुलीसाठी टोरंटो कंपनीला ११ वर्षांपासून फ्रेन्चायसी दिली असून कंपनीविरोधात तक्रारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी धामणकरनाका ते अंजूरफाटा येथील कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. कंपनीच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारने २००७ मध्ये टोरंटो कंपनीस शहरात वीजपुरवठा करणे आणि वीजबिलवसुलीसाठी फ्रेन्चायसी दिली. शहरात वीजचोरीचे प्रमाण वाढून वीजथकबाकी वाढल्याने राज्य सरकारला हे पाऊल उचलणे भाग पडले होते. कंपनीच्या हातात कारभार गेल्यानंतर शहरातील वीजचोरीचे प्रमाण नियंत्रणात आले. भरारी पथकाने तीन महिन्यांत पाच हजार ग्राहकांवर वीजचोरीच्या केस दाखल झाल्याची माहिती कंपनीच्या अधिकाºयांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसने फोटोच्या आधारे वीजग्राहकांविरुद्ध दाखल केलेले वीजचोरीचे गुन्हे मागे घ्यावेत. मान्यताप्राप्त कंपनीचे वीजमीटर बसवण्याची परवानगी देण्यात यावी. वीजचोरीच्या रकमेची आकारणी बंद करावी. कोणतीही लेखी सूचना न देता वीजग्राहकाची वीज खंडित करून त्याच्या अनुपस्थितीत वीजमीटर काढून घेऊन जाऊ नये. वीजग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण त्वरित करावे आदी तक्रारींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंजूरफाटा येथील टोरंटो कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष खालीद गुड्डू, प्रदेश निरीक्षक नसीम सिद्दीकी, अनिल फडतरे, भगवान टावरे, वसीम खान, कमलाकर टावरे आदी सहभागी झाले होते. अंजूरफाटा येथे महावितरणचे मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण व भिवंडीतील नोडेल अधिकारी रवींद्र बेलोस्कर यांनी मोर्चेकºयांचे निवेदन स्वीकारले. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.