राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2016 01:57 AM2016-01-09T01:57:07+5:302016-01-09T01:57:07+5:30
शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात रद्द करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने ८ जानेवारीला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
भार्इंदर : शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात रद्द करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने ८ जानेवारीला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या धरणांतील जलसाठा कमी असल्याने त्याचे नियोजन जुलै २०१६ पर्यंत करता यावे, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून सरासरी ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आघाडी सरकारच्या काळात विशेष बाब म्हणून शहराला पाणीकपातीमधून वेळोवेळी वगळले होते. परंतु, यंदा पालिकेसह राज्यात युतीची सत्ता असतानाही पूर्णपणे पाणीकपात केली आहे.
ती त्वरित रद्द करून त्याची अंमलबजावणी व्हावी, पाणीपुरवठ्याच्या ठिकाणाहून शहर शेवटच्या टोकाला असल्याने शहरांतर्गत होणारा पाणीपुरवठा ४० वरून सुमारे ७५ तासांवर गेला
आहे. यामुळे अनेक भागांत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे तेथे पाण्याची समस्या जटिल बनली आहे.
काही भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत असला तरी त्याचे प्रमाण सुमारे ५० टक्कयांहून कमी असल्याने पाण्याची समस्या कायम आहे. शहराला स्टेम व एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा निश्चित प्रमाणात होतो की नाही, त्याचे मोजमाप प्रशासनाकडून होत नसल्याने पालिकेकडून अव्वाच्या सव्वा बिल भरले जात आहे. त्यातच अनेक मीटर बंदावस्थेत असल्याने सरसकट काढण्यात येणाऱ्या बिलांमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने नवीन मीटर्स बसविण्यात यावेत, पाण्याची गळती सुमारे २० टक्के इतकी असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी वाया जात असल्याने गळतीचे नियोजन करून ती पूर्णत: बंद करावी.
मोर्चात माजी महापौर कॅटलिन परेरा, जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, भगवती शर्मा आदींसह इतर नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)