राष्ट्रवादी जाणार न्यायालयात, तिकीटदरवाढ केवळ ठेकेदारासाठीच असल्याची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 03:40 AM2019-02-17T03:40:25+5:302019-02-17T03:40:49+5:30
जीसीसी कंत्राट वाद : तिकीटदरवाढ केवळ ठेकेदारासाठीच असल्याची टीका
ठाणे : टीएमटीने तिकीटदरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केला. त्यामुळे या जीसीसी ठेक्याविरोधात आता उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शहराध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक नजीब मुल्ला, सुहास देसाई, मुकुंद केणी आदी उपस्थित होते. टीएमटीचा अर्थसंकल्प तुटीचा असून ठेकेदाराची तूट भरून काढण्यासाठीच हा तिकीटदरवाढीचा फंडा पुढे आणल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. ठेकेदाराची झोळी भरून काढताना केवळ इलेक्शन फंड गोळा करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. नवी मुंबईतही याच पद्धतीने कंत्राट दिले आहे. परंतु, ठामपाने ठेकेदाराला वाढीव दर दिले असून ते चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी नवीन बस जीसीसीवर दिल्या आहेत. आता पुन्हा परिवहनच्या ताफ्यातील बस दुरुस्त करून त्या ठेकेदाराला देण्याचा घाट घातला जात आहे. जीसीसीच्या १७५ बसद्वारे परिवहनला १५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. तर, परिवहनच्या ताफ्यातील १२० बसद्वारे १४ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे परिवहनच्या बस दुरुस्त करून त्या स्वत:च चालवल्या, तरी परिवहनचा फायदा होणार असल्याचे मत यावेळी मुल्ला यांनी व्यक्त केले.
टीएमटीचे दिवसाला आठ लाख रुपयांचे नुकसान
जीसीसीला देण्यासाठी परिवहनकडे पैसे आहेत, परंतु स्वत:च्या बसदुरुस्तीसाठी ते का नाहीत, असा सवालही मुल्ला यांनी केला. त्यातही जीसीसीच्या माध्यमातून परिवहनला १५ लाखांचे उत्पन्न मिळत असले, तरी दुरुस्तीचा खर्च २३ लाख आहे. त्यामुळे दिवसाला परिवहनचे आठ लाखांचे नुकसान होत असतानाही केवळ गोल्डन ठेकेदार आणि प्रशासनामध्ये असलेल्या लागेबांधेमुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे तिकीटदरवाढ रद्द करावी आणि जीसीसीच्या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी मागणी
त्यांनी केली.