मुलुंड टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:44 AM2018-05-15T02:44:02+5:302018-05-15T02:44:02+5:30
मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. त्यामुळे काही दिवस मुलुंड टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले.
ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. त्यामुळे काही दिवस मुलुंड टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले.
मुंब्रा बायपासच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने गत आठवड्यात हाती घेतले. हे काम साधारणत: दोन महिने चालणार आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. अतिशय रहदारीचा हा मार्ग बंद केल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर आला आहे. ठाणे शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. हा मुद्दा उचलून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी सकाळी मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, शानू पठाण, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजा राजपूरकर, अनुसूचित जाती सेलचे कैलास हावळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित पवार, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे, हेमंत वाणी, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रवी पालव, कुलदीप तिवारी, समीर भोईर यांच्यासह शहर कार्यकारिणीचे सदस्य आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली आणि आनंदनगर (मुलुंड) टोलनाक्यावरील वसुली थांबवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी मागणी पूर्ण न झाल्यास कायदा हातात घेऊन टोलनाके खुले करण्याचा इशाराही पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानुसार, सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आंदोलन सुरू करण्यात आले. टोलवसुलीसाठी थांबवलेली वाहने या आंदोलनामुळे टोल न घेताच सोडण्यात आली. मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ऐरोली, शीळफाटामार्गे वळवण्यात आली आहे. मात्र, या पर्यायी रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यासाठी शासन जबाबदार असल्याचा आरोप आव्हाड यांनी या वेळी केला.
>पालकमंत्र्यांवर आरोप
बायपास दुरुस्तीच्या कालावधीमध्ये वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी ऐरोली किंवा मुलुंडपैकी एकच टोलनाका सुरू राहील, अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. मात्र, त्यांची घोषणा हवेतच विरल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही टोल मान्य नसून बायपासचे काम सुरू होईपर्यंत येथील वसुली होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. पक्षाचे आंदोलन सुरू असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे येथून मार्गस्थ झाले. मात्र, त्यांनी आंदोलनाबाबत साधी विचारपूसही केली नाही. हे माणुसकीहीनतेचे लक्षण असल्याचा आरोपही आव्हाड यांनी या वेळी केला.
>यापुढे गनिमी काव्याने
टोल बंद करू
मुंब्रा बायपास अतिशय धोकादायक झाला होता. या बायपासचे काम सुरू होईपर्यंत ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावरील वसुली पक्षाचे कार्यकर्ते होऊ देणार नाही. आजचे आंदोलन करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर इशारा दिला होता. मात्र, यापुढे टोलवसुली बंद न केल्यास गनिमी कावा पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा आव्हाड यांनी या वेळी दिला.