राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार,  महागाई-लोडशेडिंग, बुलेट ट्रेनच्या निषेधार्थ मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 06:39 PM2017-09-16T18:39:10+5:302017-09-16T20:37:31+5:30

दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल- डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढत असलेल्या किमती आणि लोडशेडिंग याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात मोर्चा काढला.

NCP's opposition to BJP against Elgar, inflation-load-shedding, bullet train protests | राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार,  महागाई-लोडशेडिंग, बुलेट ट्रेनच्या निषेधार्थ मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार,  महागाई-लोडशेडिंग, बुलेट ट्रेनच्या निषेधार्थ मोर्चा

Next

ठाणे, दि.16 -  दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल- डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढत असलेल्या किमती आणि लोडशेडिंग याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. मोर्चेक-यांनी मासुंदा तलाव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन या सत्ताधा-यांना सद्बुद्धी द्या, अशी विनंती करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी जितेंद्र आव्हाड असे म्हणाले की, ''या मोर्चाच्या निमित्ताने ही अंगडाई आहे, मोठी लढाई तर पुढे सुरू होणार आहे. ज्या दिवशी भारतातील जनता रस्त्यावर उतरुन आक्रोशाचा आगडोंब उभा करेल; त्या दिवशी या भाजपाला कळेल की भारतीय जनता पेटून उठते तेव्हा केवळ आग पेटते''.

''देशात मोठ्या प्रमाणात महागाईचा आगडोंब उसळला आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर मोठया प्रमाणात वाढले आहेत. अन्नधान्य महाग झाले आहेत. अच्छे दिनचे आश्वासन देऊन मोदी यांनी नागरिकांना बुरे दिनच दाखवले आहेत'', असा आरोप करत ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने जांभळी नाका ते मासुंदा तलाव येथील शिवाजी महाराज पुतळादरम्यान मोर्चा काढला. या मोर्चात बैलगाडी, सायकलस्वार आदी सहभागी झाले होते. यावेळी रिकामे गॅस सिलिंडरसह महिला कार्यकर्त्यांनी जोरदार थाळीनाद केला. जितेंद्र आव्हाड यांनी बैलगाडी हाकून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मंदार किणे यांनी सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला. 

भर पावसात हजारो लोक सहभागी झाले होते. मोर्चेक-यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ''वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु, महँगा तेल'', ''मोदींच्या राज्यात मस्तच विकास झाला'', ''चारचाकांचा प्रवास आठ पायांवर आला'', ''मोदींनी दिली विकासाची हूल'', ''देशातला गॅस गेला आली चूल'', ''महाग झाले  पेट्रोल- डिझेल'',  ''चालवू आता फक्त सायकल''आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. या मोर्चात राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी आव्हाड यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, या देशात आता सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. इथे फक्त मरण स्वस्त झाले आहे. पण, हिंदुत्वाच्या नावावर सत्तेत आलेल्या या सरकारच्या काळात सरणासाठी लागणारी लाकडेही महाग झाली आहेत. काय स्वस्त आहे? भाजी महाग, तेल महाग, धान्य महाग, पेट्रोल महाग जीवन महाग; स्वस्त काहीच नाही. या जुमलेबाज सरकारने लोकांना वेडे केले आहे. पाकिस्तान, म्यानमार, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांमध्येही पन्नास रुपयांच्या आत पेट्रोल मिळत आहे. आपण 80 रुपयांनी पेट्रोल विकत घेतोय. अच्छे दिन- अच्छे दिन असे बोंबलणाऱया या मोदी सरकारला आता सांगावेसे वाटतेय की नको बाबा तुमचे हे अच्छे दिन, आमचे जुनेच दिन आम्हाला द्या आता, असे म्हणायची वेळ आली आहे. भारतीय जनतेवर ! 

बुलेट ट्रेनसंदर्भात ते म्हणाले की, मराठी माणसाला आजही आठवत असेल की 105 मराठी माणसाच्या छाताडावर गोळ्या घालून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव मोरारजी देसाई यांनी आखला होता. त्या 105 गोळ्या बुलेट होत्या. त्या गोळ्यांनी तुम्ही आम्हाला मारलं. आता ती बुलेट ट्रेन मराठी माणसांच्या अंगावरुन चालवा; रोज हजारो माणसं ट्रनमधून पडून मरतात. आमच्या लोकल ट्रेनवर म्हणजेच आमच्या जिवावर भारतीय रेल्वे जीवंत आहे. त्यांचा विचार केला जात नाही आणि बुलेट ट्रेन चालवली जात आहे.

या ट्रेनला महाराष्ट्रात तीन स्टेशन्स दिली आहेत. बाकी सर्व गुजरातमध्ये आहे. यात फायदा कोणाचा? या बुलेट ट्रेनचा प्रवास म्हणजे 105 बुलेटची आठवण करुन देणारा प्रकार आहे. त्यावेळी बुलेट चालवून मुंबई तोडता आली नाही. म्हणून आता बुलेट ट्रेन आमच्या छाताडावरुन चालवून मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरातच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या छाताडावरुन ट्रन चालवणे आम्हाला मान्य नाही. आधी लोकल ट्रेन सुधारा नंतर बुलेट ट्रेनचा विचार करा, असे आवाहनही त्यांनी केले. ज्यांच्या नावाने तुम्ही सत्तेवर आलात; महागाईच्या नावाने बोंबाबोब केलीत, घोटाळ्यांच्या नावाने बोंब ठोकली, मोठी-मोठी स्वप्न दाखवलीत आता तीन वर्षात तुम्ही एखादी अशी गोष्ट दाखवा की त्यातून सर्वसामान्य माणसाला सुख मिळेल, असं काही केलं आहे का? आम्हाला दु:खाच्या डोंगराखाली चिरडून टाकलं. त्यांना जे वाटतं ना, की धर्माच्या नावावर आपण जो माल विकत आहोत; त्या मालाच्या दबावाखाली जनता पुन्हा वेडी बनेल; पण, जनतेला तुम्ही जास्तकाळ असंमजसतेच्या गर्तेत अडकवून ठेऊ शकणार नाही. आता आम्ही सांगतो की या मोर्चाच्या निमित्ताने ही अंगडाई आहे, मोठी लढाई तर पुढे सुरु होणार आहे. ज्या दिवशी भारतातील जनता रस्त्यावर उतरुन आक्रोशाचा आगडोंब उभा  करेल; त्या दिवशी या भाजपला कळेल की भारती जनता पेटून उठते तेव्हा केवळ आग पेटते, असेही ते म्हणाले.    

भारनियमनाच्या बाबतीत आव्हाड म्हणाले की, आमच्या मायभगिनींना घर चालवताना नियोजन कसे करायचे ते कळते. घरात तेल नाही म्हणून स्वयंपाक होण्याचे थांबत नाही. तर महिनाभराचे रेशन आमची मायभगिनी आधीच भरुन ठेवत असते. मात्र, या सरकारला हेच नियोजन जमलेले नाही. कोळसा संपला म्हणून 12 तासांचे वीजेचे भारनियमन केले जात आहे.  जर आपणाला एवढा कोळसा लागणार आहे तर त्याचे नियोजन करणे या सरकारला शक्य होत नसेल तर त्यांनी पायउतार व्हावे. त्यांच्यापेक्षा आमच्या मायभगिनी चांगल्या पद्धतीने सरकार चालवतील, असा टोला लगावून कोळसा प्रकरणात आपल्या हिताच्या कोळसा ठेकेदाराला ठेका देण्यासाठीच ही कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. एखाद्या मोठÎा माणसाकडून कोळसा खरेदी करुन महाराष्ट्रासाठी आम्हाला जादा दराने कोळसा खरेदी करावा लागला, अशी आवई ठोकण्याच्या तयारीत हे सरकार आहे. मराठी माणसाला मुर्ख समजत आहेत. मात्र, आता मराठी माणूस या जुमलेबाजांच्या खोट्या अच्छे दिनाला बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

कोई लोटा दो मेरे बिते हुये दिन
या मोर्चेक-यांना संबोधित करताना, आमदार आव्हाड यांनी,  किशोर कुमार यांनी दूर गगन की छाव मे या 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील कोई लौटा दो मेरे बिते हुये दिन, नही चाहिये मुझे मोदी तेरे झुटे अच्छे दिन; कोई लौटा दो मेरे बिते हुये दिन, असे विडंबनात्मक गीत गायले.

(फोटो - व्हिडीओ : विशाल हळदे)

Web Title: NCP's opposition to BJP against Elgar, inflation-load-shedding, bullet train protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.