कपिल पाटील यांना राष्ट्रवादीचे भरभरून मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 01:20 AM2019-05-30T01:20:34+5:302019-05-30T01:20:57+5:30

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला.

NCP's overwhelming majority voted for Kapil Patil | कपिल पाटील यांना राष्ट्रवादीचे भरभरून मतदान

कपिल पाटील यांना राष्ट्रवादीचे भरभरून मतदान

Next

- पंढरीनाथ कुंभार
भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर झालेल्या पहिल्या २००९ च्या निवडणुकीत भाजप पक्षाचे विष्णू सावरा निवडून आले होते. यापूर्वी ते तीन वेळा वाडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. वाडा विधानसभा मतदारसंघातील बराचसा भाग भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाल्याने माजी आमदार सावरा यांनी भिवंडी विधानसभा क्षेत्रातून प्रथम निवडणूक लढविली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसे व भाजपच्या उमेदवारास पराभूत करून शिवसेनेचे शांताराम मोरे निवडून आले.
वास्तविक, हा नवा मतदारसंघ निर्माण झाल्याने या मतदारसंघात ग्रामीण भागातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाच्या बालेकिल्ल्यांचा समावेश होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी कपिल पाटील यांनी भाजपचे तिकीट मिळवून निवडणूक लढविली. तत्पूर्वी भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी बरेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेतले. त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढविताना त्यांची ताकद वाढलेली होती. परिणामी त्यांना काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना चांगल्या मतांनी पराभूत करता आले.
मागील निवडणुकीत भिवंडी ग्रामीण मतदारसंघात भाजपचे पाटील यांना ८५ हजार ५४२ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना ४२ हजार ४७३ मते मिळाली होती. ग्रामीणमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भरभरून मतदान केल्याने पाटील यांना दुप्पट मते मिळाली होती. हीच परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली. वास्तविक पहिल्यांदा कपिल पाटील निवडून आल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामीणमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये समाविष्ट केले आणि आपली पक्कड मजबूत केली. त्याचबरोबर शिवसेनेनेही आपले काम चोख बजाविल्याने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराची जादू फारशी चालली नाही. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे पाटील यांना दुप्पट मते मिळाली.
टठयावेळी पाटील यांना १,११,५६१ तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ५३,६६९ मते मिळाली. या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकाºयाने पुकारलेले बंड थंड केल्याने ते विजयी झाले. परंतु या बंडाचे फळ आपल्याला मिळेल या अतिविश्वासाने काँग्रेसचे टावरे यांना पाटील यांच्या अर्ध्या मतांपेक्षा कमी मतांवर समाधान मानावे लागले. हा फरक ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष असतानाही टावरे यांना कमी करता आला नाही.
।की फॅक्टर काय ठरला?
भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपची मते असली तरी त्यास शिवसेनेची जोड आहे. परंतु त्याचबरोबर राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेली कार्यकर्त्यांची फळी ही पाटील यांची जमेची बाजू आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत झोकून दिले होते. त्यामुळे काही ठराविक कार्यकर्ते वगळता इतर कार्यकर्ते न बिथरता त्यांनी युतीधर्म पाळला. परिणामी दुप्पट मतांना धक्का न लागता मतदान वाढले. कपिल पाटील यांनी सर्व मित्रपक्षांना व संघटनांना बरोबरीने सन्मान देऊन वागविले.त्यामुळे उमेदवारी मिळण्यापूर्वी नाराजी संपुष्टात येऊन विजय हाती लागला.
।या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणाम
आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांनी मिळविलेली मते ही शिवसेना,भाजपसह श्रमजीवी व इतर संघटनांची असून या संघटनांचा प्रभाव ग्रामीण भागात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ही जागा युतीकडे राहण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र युती शिवाय ही निवडणूक लढविल्यास अटीतटीचा सामना होईल. त्यामधून काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीस दिल्यास विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा निकाल काही वेगळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ही जागा शिवसेनेकडे असून युतीधर्म असताना या जागेवर भाजप दावा करू शकते.मात्र ही जागा युतीकडे रहाणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते.

Web Title: NCP's overwhelming majority voted for Kapil Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.