राष्ट्रवादीचे आज अंबरनाथमध्ये शक्तिप्रदर्शन
By admin | Published: February 7, 2016 02:29 AM2016-02-07T02:29:57+5:302016-02-07T02:29:57+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी व कार्यकर्ता मेळावा ७ फेब्रुवारीला अंबरनाथ येथे होणार आहे. हा तालुका पक्ष सोडून बाहेर गेलेले व आता सत्ताधारी बाकावर असलेले भाजपाचे खासदार-आमदार
- सुरेश लोखंडे, ठाणे
राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी व कार्यकर्ता मेळावा ७ फेब्रुवारीला अंबरनाथ येथे होणार आहे. हा तालुका पक्ष सोडून बाहेर गेलेले व आता सत्ताधारी बाकावर असलेले भाजपाचे खासदार-आमदार आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
चिरडच्या काठवळेवाडी येथील या जिल्हास्तरीय मेळाव्यात शेतकऱ्यांच्या समस्या व कार्यकर्त्यांच्या मागण्या, त्यातून पक्ष बळकटीकरणाचा मंत्र राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना देणार आहे.
पक्ष सोडून गेलेल्या काही लोकप्रतिनिधींना जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन दाखवू पाहत असल्याने त्यातून पक्ष बळकट होणार की फोडाफोडीला ऊत येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
माजी पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे अनुक्रमे या जिल्हा मेळाव्याचे अध्यक्ष व उद्घाटक आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व असल्याचे सातत्याने दाखवत असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सत्ता गेल्यापासून दिसेनासे असलेले सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार गोटीराम पवार आदी मंडळी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाची पाठराखण करत असल्याचे चित्र आहे.
आत्मपरीक्षण करणार
- पक्षातून बाहेर पडलेले खासदार कपिल पाटील यांच्यासह शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मतदारसंघ व एकेकाळचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पण आता भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या बालेकिल्ल्यात हा मेळावा घेऊन राष्ट्रवादी आत्मपरीक्षण करीत आहे.
- ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. तरी, त्यांनी या मेळाव्यात शेतकऱ्यांना निमंत्रित केले आहे.