'जनताच सरकारला महागलेल्या इंधनात जाळेल',ठाण्यात इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 12:22 PM2018-04-03T12:22:18+5:302018-04-03T12:22:18+5:30

आता या महागाईला विटलेली जनताच या सरकारला महागलेल्या इंधनामध्ये जाळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. 

NCP's protest of fuel hike in Thane | 'जनताच सरकारला महागलेल्या इंधनात जाळेल',ठाण्यात इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

'जनताच सरकारला महागलेल्या इंधनात जाळेल',ठाण्यात इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

googlenewsNext

ठाणे - आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घसरलेले असतानाही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांना स्वायत्तता दिल्यामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. या सर्व महागाईला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, महागाई गगनाला भिडलेली असताना 'मन की बात' करणारे पंतप्रधान संसदेत उत्तर देण्याऐवजी प्रचारकी थाटात भाषणे करीत आहेत. त्यामुळे आता या महागाईला विटलेली जनताच या सरकारला महागलेल्या इंधनामध्ये जाळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. 

गेल्या काही दिवसांपासून देशातील इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. पेट्रोल 82 रुपयांवर गेले आहे. तर, सीएनजी आणि पीएनजीचेही दरही गगनाला भिडले आहेत. या सर्व महागाईला राज्य आणि केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी हातगाडीवर दुचाकी ठेवून त्या ढकलण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आदी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार आनंद परांजपे यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. एप्रिल 2018 मध्ये पेट्रोल -डिझेलच्या दराने आजवरचा उच्चांक गाठला आहे.  आज डिझेल 68.89 रुपये होते. तर पेट्रोल  81.69 रुपये झाले आहे. सीएनजीचे दर 44. 22 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तर पीएनजीचे म्हणजेच गॅसने पुरवठा केल्या जाणार्‍या गॅसचे दर 26. 87 प्रति स्टँडर्ड क्युबीक मीटर झालेले आहेत. सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षांचे भाडे आता वाढणार आहे. ठाण्यासारख्या शहरात टीएमटीच्या प्रवासाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे सामान्य लोक रिक्षाचा वापर करीत असतात. आता या रिक्षांचेही दर वाढणार असल्याने लोकांवर पुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणेच चालत प्रवास करण्याची वेळ मोदी सरकारने आणली आहे.

तर, पीएनजीचे दर वाढल्याने गृहीणींचे बजेटही कोसळणार आहे. पगारदारांचा पैसा आधीच बड्या भांडवलदारांच्या खिशात घातला असताना आता स्वयंपाकघरातील सुबत्ताही हे सरकार हिरावून घेत आहे.  या देशात सध्या जनतेच्या हिताचा कोणताही निर्णय घेतलाच जात नाही. पंतप्रधान मन की बात करीत आहेत. मात्र, धन की बात करणार्‍यांना अभय दिले जात आहे. हे धन की बात करणारे चोक्सी, मल्लया आणि निरवसारखे लोक कोट्यवधी रुपये घेऊन पसार होत आहेत. या चोरांना पकडण्याऐवजी हे मोदी सरकार गोरगरीब जनतेच्या खिशात हात घालू ती भरपाई करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना आता शहरी माणसानेही महागाईच्या ओझ्याखाली आत्महत्या कराव्यात; असेच या सरकारला वाटत आहे. त्यामुळे हे सरकार आता गरिबांच्या घामाबरोबरच त्यांच्या जीवाचेही भुकेले आहे की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. म्हणूनच आगामी 2019 मध्ये या सरकारलाच भारतीय जनता महागलेल्या इंधनात जाळेल, असा विश्वासही परांजपे यांनी व्यक्त केला. 

Web Title: NCP's protest of fuel hike in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.