राष्ट्रवादीचे रवी पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:48 AM2019-04-18T01:48:57+5:302019-04-18T01:49:20+5:30
वर्षभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले उद्योजक रवी पाटील यांच्यावर सहा ते सात जणांनी सळई तसेच चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री आसनगाव येथे घडली.
शहापूर / कसारा : वर्षभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले उद्योजक रवी पाटील यांच्यावर सहा ते सात जणांनी सळई तसेच चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री आसनगाव येथे घडली. या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजलेले नाही.
भिवंडी मतदारसंघातील शहापूर-किन्हवली येथील काँग्रेसचा प्रचारदौरा आटोपल्यानंतर घरी जात असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज विशे, मिलिंद देशमुख, रवींद्र पाटील आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास चेरपोली येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले. पाटील यांनी त्यांची गाडी आसनगाव येथील एका हॉटेलजवळ ठेवली होती. त्यामुळे संजय निमसे आणि मिलिंद देशमुख यांनी त्यांना तेथे सोडले आणि ते निघून गेले. मात्र, गाडीचा टायर पंक्चर झाल्याचे जाणवल्याने पाटील खाली उतरले असता, अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
दरम्यान, सरलांबे येथील शिवाजी अधिकारी यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. शिवाजी अधिकारी यांना विचारले असता, या घटनेत माझा हात असल्याचा उल्लेख केल्याबाबत आपल्यालाही आश्चर्य वाटल्याचे ते म्हणाले. पाटील हे माझे मित्र असून, हल्ल्याचे नेमके कारण ठाऊक नाही.
निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने पाटील यांच्यावर शहापूरची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
>... तरीही कारवाई नाही
रवींद्र पाटील यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी एकदोघांना ओळखले होते. पाटील यांनी त्यांची नावे शहापूर पोलिसांना दिली. मात्र, शहापूर पोलीस याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे पाटील कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात येत आहे.