राष्ट्रवादीतील बंड शमले, पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे अध्यक्षपद; भाजपाची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 08:33 PM2021-07-20T20:33:00+5:302021-07-20T20:33:22+5:30
Palghar Zilla Parishad Election: गट स्थापनेवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या दोन गटात झालेल्या राड्या नंतर महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवरून सुरू होते.
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वैदेही वाढाण तर भाजपच्या सुरेखा थेतले तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या निलेश सांबरे गटाचे ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे आणि भाजपचे महेंद्र भोणे ह्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. अखेरच्या वेळेत भाजपच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अखेर वैदेही वाढाण यांची अध्यक्षपदी तर ज्ञानेश्वर सांबरे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. लोकमत ने मंगळवारी प्रसिद्ध केलेले वृत्त अखेर खरे ठरले.
गट स्थापनेवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या दोन गटात झालेल्या राड्या नंतर महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवरून सुरू होते. त्यातच चिंचणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी ह्या घटक पक्षाने शिवसेनेची एक हाती सत्ता असताना त्यांचे तीन सदस्य फोडून उपसरपंच पद मिळविले होते. ह्या घडामोडी नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही शिवसेनेला दे धक्का देत नवीन समीकरण निर्माण करण्याचे काहींचे मनसुबे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, सेनेचे एकनाथ शिंदे ह्यांनी एकत्र येत उधळून लावले.
जिल्हा परिषदेत पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता प्रस्थापित होईल ह्याला प्राधान्य देण्यावर भर दिला. त्यामुळे आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील सुरू असलेली धुसफूस शांत झाल्याने निवडणूक प्रक्रियेत कुठलाही अडथळा न येता निवडणूक प्रक्रिया पार पडली. ह्यावेळी सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे, गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री दादासाहेब भुसे, खा.राजेंद्र गावित, राजन विचारे, आ.रवींद्र फाटक आदींनी विजेत्यांचे अभिनंदन केले.