राष्ट्रवादीच्या हणमंत जगदाळेंचा गटनेतेपदाचा राजीनामा, पक्षाच्या कारभारावर टिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 05:07 PM2019-08-29T17:07:59+5:302019-08-29T17:08:52+5:30
ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.
ठाणे - लोकशाही आघाडीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी गुरुवारी आपल्याच पक्षाच्या विरोधात असहार पुकारत गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिकेत विरोधी पक्षाची भुमिका बजावत नसून गटाच्या बैठकीत जे निर्णय होतात, ते बदलले जातात असा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच काही ठरावही पक्षातील जेष्ठ मंडळी अचानकपणो बदलत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तुर्तास त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी ते येत्या काळात भाजप किंवा शिवसेनेची वाट धरण्याची शक्यता असल्याची माहितीही सुत्रांनी दिली.
ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. 2017 नंतर ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व कुठेही दिसत नाही. केवळ टेंडरसाठी छुपी मैत्री केली जात असून मैत्री करायचीच तर खुलेपणाने करावी असा गंभीर आरोप त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता केला आहे. गटाच्या बैठकीत काही निर्णय घेतले जातात. मात्र प्रत्यक्ष वेळी हे निर्णय बदलेले जात असून राष्ट्रवादी पक्ष केवळ सत्ताधाऱ्यांच्या बाजुने बोलत असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली. या संदर्भात वारंवार विरोधी पक्षनेते, पक्षातील श्रेष्ठी यांच्याकडेही तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्यातून काहीच साध्य झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. क्लस्टरचा प्रस्ताव होत असतांना त्यामध्ये शास्त्री नगरचा समावेश होता. मात्र, त्या प्रस्तावाच्या ऐवजी दुसराच प्रस्ताव मंजुर झाला आणि त्यातून शास्त्रीनगरचे नाव वगळण्यात आले. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्यांची स्वाक्षरी असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे चार नगरसेवक जाणो अपेक्षित असतांना केवळ या मंडळींचे असलेले छुप्या मैत्रीच्या संबधांमुळे तीनच सदस्य स्थायी समितीत गेले आहेत. कोणताही ठराव करतांना अथवा पक्षाची भुमिका विषद करतांना गटनेते म्हणून विश्वासात घेतले जात नाही, सत्ताधारी पक्ष व प्रशासनाचे उत्तम संबध असतांना स्वीकृत नगरसेवक म्हणून आपला एक नगरसेवक निवडून न येणे आदी मुद्यांना हात घालत त्यांनी आपल्याच पक्षातील वरीष्ठांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
जगदाळे शिवसेना का भाजपमध्ये जाणार
दरम्यान पक्ष सोडणार का? असा सवाल त्यांना उपस्थित केला असता, तुर्तास तरी तसा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु जगदाळे हे गणोश नाईक यांच्या संपर्कात असल्याची माहिती या निमित्ताने समोर येत असून नाईक यांच्या समवेत जगदाळे आणि त्यांचे इतर तीन सहकारी नगरसेवक आणि दिव्यातील व कळव्यातील दोन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र दुसरीकडे जगदाळे भाजपमध्ये न जाता शिवसेनेत यावेत यासाठी शिवसेनेकडून जोरदार फिल्डींग लावली गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार जगदाळे यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी क्लस्टरचे अमीष दाखविले जात असून त्याच जोरावर त्यांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची शिवसेनेच्या सुत्रंनी दिली.
सभागृहात आम्ही नेहमी विरोधी पक्षाची भुमिका चोख बजावलेली आहे. गटाच्या बैठकीत झालेले निर्णय बदलेले जातात असा जो काही आरोप आहे, तो चुकीचा आहे. वास्तविक पाहता तुम्ही गटनेता होता मग या विरोधात आवाज का नाही उठविला. पक्षाला बदनाम करण्याचे वारंवार काम आपण केले आहे. मागील 15 वर्षे आपण पक्षात विविध भुमिका बजावल्या असतांना आज आपणच पक्षाला बदनाम करणो कितपत योग्य आहे.
(मिलिंद पाटील - विरोधी पक्षनेते - ठामपा)