भाजपाला रोखले हेच राष्ट्रवादीचे यश
By admin | Published: February 24, 2017 07:46 AM2017-02-24T07:46:41+5:302017-02-24T07:46:41+5:30
काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेला विलंब, जागावाटपामध्ये केलेली दिरंगाई यामुळे
जितेंद्र कालेकर / ठाणे
काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेला विलंब, जागावाटपामध्ये केलेली दिरंगाई यामुळे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला आपली ताकद वाढवता आली नसली तरी राज्यात सत्ता नाही आणि शिवसेना व भाजपा या दोन हत्तींच्या झुंजीतही आपले मागील संख्याबळ राखण्यात या पक्षाने यश मिळवले आणि ठाण्यात दुसऱ्या क्रमांकाकरिता सुरु असलेल्या स्पर्धेत भाजपाला पिछाडीवर टाकले.
या वेळी सत्तेसाठी राष्ट्रवादीची मदत इतर पक्षांना घ्यावी लागेल, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. शिवसेनेला मोठे यश लाभल्याने तशी वेळ आली नाही. राष्ट्रवादीने लढवलेल्या ८७ पैकी निम्म्याही जागा राष्ट्रवादीला जिंकता आलेल्या नाहीत. आघाडीच्या १३१ पैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला ७२ जागा आल्या होत्या. कळवा-मुंब्य्रात दोघांमध्ये एकमत न झाल्याने १५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली. २०१२ मध्ये १३० पैकी राष्ट्रवादीने ३४, तर काँग्रेसने १८ जागा जिंकून शिवसेना-भाजपा युतीला घाम फोडला होता.
या वेळी सेना-भाजपाच्या युतीच्या रखडलेल्या चर्चेवर आघाडीचा निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादीने अखेरपर्यंत उमेदवार निश्चित केले नव्हते. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अवधी मिळालाच नाही. एकीकडे आव्हाडांनी उमेदवारांच्या एबी फॉर्मच्या वाटपापासून ते प्रचारापर्यंतची धुरा एकहाती ठेवल्याने वसंत डावखरे, गणेश नाईक, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही नेते मंडळी प्रचारात फारशी दिसलीच नाही.
हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, टीडीसीचे अध्यक्ष बाबाजी पाटील, जितेंद्र पाटील या पक्षासाठी प्रतिष्ठेच्या जागा जिंकण्यात राष्ट्रवादीने यश मिळवले, ही या पक्षासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. राष्ट्रवादीचे नेते तथा अध्यक्ष शरद पवार यांच्या एकाच दिवशी दिवा आणि वागळे इस्टेट भागात झालेल्या दोन प्रचारसभा, सुप्रिया सुळे यांच्या मोजक्या चौकसभा आणि रॅली वगळता पक्षाला प्रचारामध्ये फारसा रंग भरताच आला नाही. आव्हाडांकडे ठाण्याच्या प्रचाराची मुख्य धुरा असली, तरी त्यांचाही प्रचार कळवा आणि मुंब्य्राच्या परिघातच दिसला. शहरात तर तो केवळ पोस्टरबाजीत अडकला. अगदी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुतण्याचीही जागा पोषक वातावरण असून राखता आली नाही. सत्ताधारी सेनेने केलेला भ्रष्टाचार आणि गैरकारभाराची आकडेवारीनिहाय पत्रकार परिषदेद्वारे जशी त्यांनी माहिती दिली, तशी ठाण्याच्या विकासासाठी नेमके काय करणार आहे, याचा तपशील मात्र ते मांडू शकले नाहीत. आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीच प्रचाराची धुरा वाहिली. तिकीटवाटपातील कुरबुरी आणि अंतर्गत गटातटांच्या राजकारणाचे ओंगळवाणे दर्शन निवडणुकीत झाले.