कळवा-मुंब्य्रात राहणार राष्ट्रवादीचा वरचष्मा
By admin | Published: January 9, 2017 06:46 AM2017-01-09T06:46:50+5:302017-01-09T06:46:50+5:30
ठाणे शहरातील विधानसभा मतदारसंघात जरी शिवसेना-भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार असली, तरी कळवा, मुंब्रा या मतदारसंघात
अजित मांडके / ठाणे
ठाणे शहरातील विधानसभा मतदारसंघात जरी शिवसेना-भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार असली, तरी कळवा, मुंब्रा या मतदारसंघात गेली १० वर्षे राष्ट्रवादीचे वर्चस्व टिकून आहे. मुंब्य्रात दोन्ही काँग्रसची ताकद समसमान असली, तरी गेल्या काही महिन्यात बदलेल्या राजकीय गणितांचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात आघाडी आणि कळवा-मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीची तयारी राष्ट्रवादीने केली आहे.
या भागात राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचे वर्चस्व कमी आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच सरस ठरल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने कळव्याकडे थोडया प्रमाणात लक्ष केंद्रीत केल. पण मुंब्य्रावर फारसे लक्ष दिलेले नाही. एमआयएम आणि सपा या ठिकाणी मतांची विभागणी करेल. त्याचा फायदा आपल्याला उठवता येईल अशी त्यांची अटकळ आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ म्हणजे माजी मंत्री आणि ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला. मागील निवडणुकीत अनेक समीकरणे त्यांच्याविरोधात होती. सत्ताधाऱ्यांनी सपासह, एमआयएम आणि येथे अपक्ष रिंगणात उतरवून आव्हाडांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचे ठरविले. परंतु त्यांनी या सर्वांना सुरुंग लावला. देशासह राज्यात भाजपाचे वारे वाहत असतांनादेखील कळवा, मुंब्रा मतदारसंघावर राष्ट्रवादीने वरचष्मा कायम ठेवला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना ८५ हजार ४०७ मते मिळाली, तर शिवसेनेचे दशरथ पाटील यांना ३८ हजार ४१२ मते मिळाली. मनसेच्या महेश साळवी यांना केवळ २ हजार ७८३, भाजपचे अशोक भोईर यांना १२ हजार २३१, एमआयएमचे अश्रफ मुलानी यांना १४ हजार ७१२, कॉंग्रेसचे यासीम कुरेशी यांना ३ हजार ७१७ मते मिळाली. खरी लढत जितेंद्र आव्हाड विरूद्ध पाच पक्ष अशी होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष होते. पण आव्हाड ४७ हजार ४८ मताधिक्याने निवडून आले.
राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना अपक्ष लढण्याच्या तयारीत असली तरी त्यांची येथे फारशी डाळ शिजेल, असे काही वाटत नाही. भाजपासुद्धा कळव्यावर लक्ष देऊन आहे. मुंब्य्राकडे त्यांनी फारसे लक्ष दिलेले नाही. एमआयएम आणि सपादेखील नशीब आजमावणार असल्याने मतांच्या टक्केवारीत काहीसा फरक पडू शकतो. एकूणच कळवा-मुुंब्य्रात सध्या तरी राष्ट्रवादी सरस असल्याची स्थिती आहे.
नव्या कळवा, मुंब्य्रातून ३६ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने बालेकिल्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरवात केली आहे. कॉंग्रेसला धक्का देत राष्ट्रवादीने राजन किणे यांच्यासह अनेकांना राष्ट्रवादीत खेचून आणल्याने येथील गणिते राष्ट्रवादीच्या बाजुने झुकल्याचे चित्र आहे.