चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ठाण्यात एनडीआरएफ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:38 AM2020-06-02T00:38:21+5:302020-06-02T00:38:50+5:30

२० जणांचे पथक : ठाणे महापालिकेचे टीडीआरएफ ही सज्ज

NDRF filed in Thane to deal with cyclone | चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ठाण्यात एनडीआरएफ दाखल

चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ठाण्यात एनडीआरएफ दाखल

Next

ठाणे : दक्षिणपूर्व आणि पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून चक्रीवादळचा धोका संभावण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने ठाण्यात सोमवारी सकाळी एनडीआरएफची टीम तैनात केली आहे. ठाणे महापालिकेची टीडीआरएफची टीमदेखील त्यांच्या मदतीला सज्ज ठेवली आहे.


कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे आता चक्रीवादाळाचा धोका २ आणि ३ जून रोजी मुंबईसह, ठाणे जिल्हा, पालघर येथे संभावू शकतो, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे त्यानुसार सोमवारी वातावरणात तसा बदलही दिसून आला. शहरात अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी सकाळी बरसत होत्या. परंतु, चक्रीवादळ येणार असल्याने यात हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना सर्तकर्तेच्या सुचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक महापालिका आणि नगरपालिकेने यासाठी आपल्या यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असेही सांगण्यात आले आहे. या विविध यंत्रणासोबत आता एनडीआरएफची टीमही सोमवारी ठाण्यात पहाटे दाखल झाली. त्यांच्या राहण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार माजिवडा येथील महापालिकेच्या एका इमारतीमध्ये त्यांची सोय केली आहे.

चक्रीवादळामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये
ठाणे : कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान खात्याने सांगितले असून ताशी ५० ते ७० किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे चक्रीवादळाचा धोका आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
याकाळात समुद्र खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किनाºयावर आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर किनाºयावरील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी हा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या टीममध्ये २० जवान आणि तीन वाहनचालक यांचा समावेश आहे. ती या दोन दिवसांत चक्रीवादळामुळे काही हानी झाली तर तत्काळ धाव घेणार असून ३५ जणांची टीडीआरएफची टीमदेखील या कामासाठी सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.

Web Title: NDRF filed in Thane to deal with cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.