एनडीआरएफचे जवान आता होणार ठाण्यातील घोडबंदरनिवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:42 AM2018-06-11T03:42:38+5:302018-06-11T03:42:38+5:30
पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी मुंबईकरांसह ठाणेकरांना राष्ट्रीय आपत्ती बचाव व शोध पथकाचे (एनडीआरएफ) पाठबळ प्राप्त झाले आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी मुंबईकरांसह ठाणेकरांना राष्टÑीय आपत्ती बचाव व शोध पथकाचे (एनडीआरएफ) पाठबळ प्राप्त झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात त्यांच्यासाठी ठाणे महापालिकेकडून (टीएमसी) घोडबंदर या निसर्गाच्या सान्निध्यात खास निवासव्यवस्था केली. मुंबईच्या अंधेरी येथील लष्कराच्या छावणीत राहणे पसंत करणाऱ्या एनडीआरएफ पथकाने घोडबंदरला नापसंती दर्शवली होती. मात्र, ठाणेकरांच्या प्रेमापोटी त्यांनी घोडबंदरला निवासी येण्यास तयारी दर्शवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या अतिलोकवस्तीच्या परिसरांत पावसाळ्यात जीवघेण्या आपत्तीच्या संकटांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. यावर वेळीच मात करून संकटग्रस्तांना त्वरित मदतकार्य करून पाठबळ देणे शक्य व्हावे, यासाठी केंद्र शासनाने मुंबई व ठाणे परिसरांसाठी एनडीआरएफची तीन पथके अंधेरीच्या लष्करी छावणीत तैनात केले आहेत. १२० जवानांच्या या तीन पथकांतील एक पथक ठाणे येथील घोडबंदर परिसरात वास्तव्यास ठेवण्याची विनंती ठाणे महापालिकेने केली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर त्यास यश मिळाले. मात्र, एनडीआरएफचा होकार येण्यास विलंब झाल्यामुळे दुखावलेली ठाणे महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय त्यावर काय निर्णय घेणार, याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागून आहे.
आपत्तीप्रसंगी धावून जाणार
एनडीआरएफचे जवान घोडबंदरला निवासी राहिल्यास त्यांना ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर आदी संभाव्य आपत्तीप्रसंगी सहज धावून जाता येणार आहे. एवढेच नव्हे तर मुंबईतही त्यांना अल्पावधीत पोहोचता येईल.
पण, अंधेरी येथे निवासी राहिल्यास एनडीआरएफच्या १२० जवानांचे पथक ठाण्यासह परिसरात पोहोचण्यास सुमारे अर्धा तास लागणार आहे. अंधेरीच्या छावणीतील लष्करी तुकडीत ५८ जवान सक्रिय आहेत. त्यांना मदतकार्यासाठी ठाण्यासह परिसरात येण्यासाठी सुमारे दोन तासांचा कालावधी लागणार आहे.
वाहतूककोंडी असल्यास आपत्तीस्थळी येण्यास विलंब लागू शकतो. यावर वेळीच मात करण्यासाठी एनडीआरएफ जवानांच्या सहमतीने त्यांची घोडबंदरला निवासव्यवस्था करणेच अपेक्षित असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.