युवा पिढीला तंबाखूपासून दूर ठेवण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:44+5:302021-06-03T04:28:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जाहिराती किंवा सिनेमात अनेकदा हिरो तणावात असताना किंवा स्टाइल मारत सिगारेट ओढताना किंवा दारू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जाहिराती किंवा सिनेमात अनेकदा हिरो तणावात असताना किंवा स्टाइल मारत सिगारेट ओढताना किंवा दारू पिताना दिसतात. त्यामुळे तरुण या गोष्टीने प्रभावित होऊन हिरोगिरी करत व्यसनाधीन होतात. सुमारे ९० टक्के तरुण १८ व्या वर्षाच्या सुमारास नशा करण्यास सुरुवात करतात. युवा पिढीला तंबाखू व अन्य नशाखोरीपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता श्रीवास्तव यांनी सोमवारी ‘व्यसनमुक्ती आणि पर्यावरण रक्षण’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.
व्यसनमुक्ती जनजागृती सेवा संस्थेतर्फे तंबाखू निषेध दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण व संवाद सभेत प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीवास्तव बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे संस्थापक जगदीश खैरालिया होते.
तंबाखूमुळे कॅन्सर, क्षयरोग आणि हृदयरोग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. कोरोनाकाळात छातीचे आजार असलेल्यांना धोका अधिक आहे. अशा परिस्थितीत व्यसनांना नकार देण्याची सवय लावण्यासाठी समजात प्रबोधन करावे, अशी सूचनाही श्रीवास्तव यांनी केली. सर्वांनी आज तरुणांना नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
चित्रकला स्पर्धेचे परीक्षक कमर्शियल आर्टिस्ट सुविधा बंगेरा यांनी पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले, तसेच चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच २९ स्पर्धकांनी काढलेल्या चित्रांचे सादरीकरण केले. त्यानंतर प्रत्येक गटातील विजेत्यांचे नाव घोषित करत प्रत्येक चित्राचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णनही केले.
-------------