आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 09:57 AM2024-01-20T09:57:18+5:302024-01-20T09:57:34+5:30
आयुष मंत्रालयातर्फे ‘आयुर्वेद सर्वांसाठी - जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन’ या विषयावर ठाण्यात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन, २०२४ चा प्रारंभ नाईक यांच्या हस्ते झाला.
ठाणे : विश्वात अनेक चिकित्सा आहेत, परंतु आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आणखी प्रयत्न केल्यास जगात आयुर्वेदाचा आणखी प्रसार होईल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे केले.
आयुष मंत्रालयातर्फे ‘आयुर्वेद सर्वांसाठी - जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन’ या विषयावर ठाण्यात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन, २०२४ चा प्रारंभ नाईक यांच्या हस्ते झाला.
आधुनिक जीवन व वेद अर्थात ज्ञान, तसेच जीवन कशा प्रकारे जगायचे, हे सांगणे म्हणजे आयुर्वेद होय. आधुनिक जीवन जगताना मूळ सिद्धांतावर यावेच लागेल. कोरोनासारखे अनेक शत्रू यापुढेही हल्ला करण्यास सज्ज आहेत, अशा वेळी आयुर्वेद सक्षम करणे गरजेचे आहे, असे नाईक म्हणाले.
महाविद्यालय बंद होणार?
भारतात सर्वांत जास्त आयुर्वेदिक महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे येथे एक स्वतंत्र आयुर्वेदिक विद्यापीठ व्हावे, तसेच प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात आयुर्वेदाचा समावेश होणे गरजेचे आहे, असे मत महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी व्यक्त केले.
मरिन ड्राइव्ह परिसरातील बंद होण्याच्या मार्गावरील जुने मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालयाकडे लक्ष देऊन, ती जागा आयुर्वेदाच्या कामासाठी उपयोगात आणावी, अशी विनंती त्यांनी केली. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आयुषच्या माध्यमातून काही सुयोग्य हस्तक्षेप करून होणारे दीर्घकालीन नुकसान रोखण्याचा प्रयत्न आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले.