शेतकऱ्यांनी अडचणी सोडविण्यासाठी एकत्र येण्याची काळाची गरज - अंकुश माने
By सुरेश लोखंडे | Published: September 5, 2022 12:39 PM2022-09-05T12:39:43+5:302022-09-05T12:41:44+5:30
कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ठाणे : अत्यल्प भूधारक शेतक-यांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बोअरवेल, विहिरीवर अवलंबून राहता येत नाही कारण विहीर किंवा बोअरवेल मारून तिथे पाणी लागेल, याची शाश्वती नाही. त्यासाठी अस्तरीकरणासह शेततळे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण, जागेच्या अभावामुळे शेततळे करता येत नसेल तर सामूहिकपणे एकत्र येऊन शेततळे उभारावे, यासाठी रोजगार हमी योजनेद्वारे मिळणाऱ्या शेततळे अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी कारंद तालुका अंबरनाथ येथे आयोजित 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमावेळी केले.
कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात अधिकारी वर्ग शेतकऱ्यांसोबत दिवसभर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत व त्यांच्याशी चर्चा करून यावर उपाय योजनेसाठी प्रयत्न करणार आहेत. यानिमित्ताने अंबरनाथमधील कारंद येथे भेट देऊन रत्नागिरी ८ या वाणांची चारसुत्री पद्धतीने केलेली भात लागवडची पाहणी केली.
भात पिक परिस्थितीची पाहणी केली. किड रोग उपाय योजनाबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. वाकड्याची वाडी येथे शेतकरी चर्चा सत्र झाले. यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड, मोगरा लागवड, बाजारात मागणी असणाऱ्या पिकांची लागवड, शेततळे, मत्स्य शेती याबाबत माहिती माने यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
याचबरोबर, पीएमकिसान अंतर्गत केवायसी करणे, ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या पिकांची नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. रत्नागिरी ८ वाणाचे बियाणे जतन करून इतर शेतकऱ्यांना देण्यासाठी आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीला आवश्यक विजेची सोय, पाण्याची कमतरता, अत्यल्प जमिनी, बाजारभाव याबाबत अडचणी मांडल्या. या कार्यक्रमाला उल्हासनगर तालुका कृषीअधिकारी विठ्ठल कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सुवर्णा माळी, कृषी पर्यवेक्षक अविनाश वडते आदींसह कृषी सहायक सचिन तोरवे, अनिता नेहे, जयश्री साठे आदींनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.