फुलपाखरांसाठी उद्यानांची आवश्यकता, लॉकडाऊनमध्ये यूबीसीजीची जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 01:54 AM2020-10-27T01:54:10+5:302020-10-27T01:54:46+5:30
Thane News : सोसायटीच्या आवारात किंवा आपल्या बाल्कनीत फुलपाखरे उद्याने उभारावी, असे आवाहन केले जात आहे. लॉकडाऊनकाळात ठाण्यातील काही सोसायट्यांनी फुलपाखरू उद्याने उभारली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे : बेसुमार वृक्षतोड आणि वाढत्या शहरीकरणामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होत चालल्याने त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे, ही चिंतेची बाब असून त्यांच्या संवर्धनासाठी सोसायट्यांनीच आता पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी अर्बन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन ग्रुपकडून (यूबीसीजी) लॉकडाऊनकाळात जनजागृती करण्यात येत आहे. यात सोसायटीच्या आवारात किंवा आपल्या बाल्कनीत फुलपाखरे उद्याने उभारावी, असे आवाहन केले जात आहे. लॉकडाऊनकाळात ठाण्यातील काही सोसायट्यांनी फुलपाखरू उद्याने उभारली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिमेंट काँक्रिटच्या जंगलात वृक्षांची कत्तल होत असल्याने ती पुस्तकातच बघण्याची वेळ येते की काय, असा प्रश्न पर्यावरणतज्ज्ञांसह पर्यावरणप्रेमींनीही व्यक्त केला आहे. अंड-अळी-कोष या फुलपाखरांच्या अवस्था आहे. त्या खाद्यवनस्पतींवर असतात. परंतु, याच वनस्पती नष्ट होत असल्याने गेल्या १० वर्षांच्या तुलनेत ती खूप रोडावलेली आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. फुलपाखरे फुलांच्या झाडांवर मधुरस चाखायला येतात. एकीकडे जंगले नष्ट होत आहे, दुसरीकडे शहरांत वृक्षांची कत्तल तसेच, झाडांवर करण्यात येणारी कीटकनाशकांची फवारणी, शहरात जिथे हिरवळ करण्यात आली, तेथे विदेशी झाडांची लागवड केल्याने फुलपाखरांचा अधिवासच नष्ट झाला आहे, असे यूबीसीजीचे संस्थापक अध्यक्ष समीर गुलवणे यांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी यूबीसीजीने फुलपाखरू निरीक्षण केले, तेव्हा सोळंकीधाम, नीळकंठ हाइट्स आणि गावंडबाग या तीन सोसायट्यांमध्ये ४८ प्रजातींची फुलपाखरं आढळली होती. लॉकडाऊनकाळात रहेजा गार्डन, सिद्धांचल फेज-२ येथे फुलपाखरू उद्यान तयार केल्याचे गुलवणे यांनी सांगितले.
मी स्वत: फुलपाखरांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांची मला आवड आहेच. सोसायटीची उद्यानप्रमुख झाले, तेव्हा मी सोसायटीमध्ये उद्यान उभारले आणि आता ते विस्तारत नेले आहे. ऑगस्ट महिन्यात तेथे स्थानिक वनस्पतींची लागवड केली, त्यामुळे आता फुलपाखरांची संख्या वाढली आहे.
- हरजित झांस,
सिद्धांचल सोसायटी फेज-२