देशाचे अखंडत्व टिकविणाऱ्या नेतृत्वाची गरज- रवींद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:28 PM2018-10-30T23:28:35+5:302018-10-30T23:28:59+5:30
देशातील सर्व धर्म समभावाचा विचारही काळाची गरज आहे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
डोंबिवली : देशाला सरदार वल्लभभाई पटेल यांचा सारख्या नेतृत्वाची गरज आहे. या देशाचे अखंडत्व टिकले पाहिजे. देशातील सर्व धर्म समभावाचा विचारही काळाची गरज आहे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे मुंबई विभागाचे राष्ट्रीय अधिवेशन व प्रचार सभा रविवारी होरायझन सभागृहात झाली. या वेळी चव्हाण बोलत होते. समाजातर्फे २४ व २५ नोव्हेंबरला पुणे येथे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम झाला.
या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राजेश मोरे, संस्था समन्वयक संजय पाखले, विजयकुमार वाणी, कैलास वाणी, राजेश कोठावदे, अनिल चितोडकर, अजय मालपुरे, निलेश पूरकर, आर. एल. वाणी, शामकांत शेंडे, शशिकांत येवले, अभय नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, सगळ्यांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने समाजाने हे अधिवेशन घेतले आहे. ग्रामीण भागातील समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिवेशनाचा लाभ होणार आहे. तसेच या अधिवेशनाद्वारे देशाला चांगला पंतप्रधान कसा लाभला पाहिजे हे एक सत्र घेतले तर त्यांचा फायदा पुढच्या पिढीला होईल. देशाला मार्गदर्शन ठरू शकतील, अशी पाच वर्षे तुम्हाला आणि आम्हाला ठरवायची आहेत. तो निर्णय चुकला तर अडचणी येऊ शकतात. आपण सर्वांनी ‘भारतमाता की जय’ या मंत्राबरोबर चालणे गरजेचे आहे.
खा. शिंदे म्हणाले, कल्याण व डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर वाणी समाज आहे. या सर्वांना अधिवेशनच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम होत आहे. वाणी समाज हा व्यवसाय करण्यासाठी ओळखला जातो. परंतु, मराठी माणूस आता सर्व व्यवसायात आहे. मराठी माणसाला ती ओळख वाणी समाजाने करून दिली आहे.
आदिशक्तीला कमी लेखू नका
आमदार भोईर म्हणाले, महिलांची खरी ताकद या अधिवेशनात दिसून येणार आहे. चांगल्या प्रकारचे कार्यकर्ता निर्माण करण्याचे काम महिलांमध्ये आहे. त्यामुळे आदिशक्तीला कमी लेखण्याचे काम करू नका. सर्वपक्षीय नेते येतात तेव्हा भरभरून देण्याची ताकद असते. तुमच्या सर्व मागण्या तिथे पूर्ण होतील. मी आमदार म्हणून अधिवेशनात विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले.