समाजाला समृद्ध करणाऱ्या ग्रंथांची गरज ! - डॉ. अनंत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 04:56 PM2019-10-14T16:56:03+5:302019-10-14T16:59:03+5:30
'प्रतिसादाचे हुंकार' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी डॉ. अनंत देशमुख उपस्थित होते.
ठाणे : समाजाचे अंतर्मन ढवळून काढून सामाजिक समरसतेचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या, समाजाला समृद्ध करणाऱ्या ग्रंथांची गरज असल्याचे मत मराठी साहित्याचे गाढ़े अभ्यासक डॉ . अनंत देशमुख यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखिका यामिनी पानगावकर यांच्या 'प्रतिसादाचे हुंकार' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर लेखक डॉ. प्रदीप ढवळ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ख्यातनाम चित्रकार विजयराज बोधनकर , सामाजिक कार्यकर्ते विलास ठुसे , अत्रे कट्टयाच्या निर्मात्या विदुला ठुसे ,प्रकाशक प्रा. संतोष राणे , प्रा. प्रज्ञा पंडित इत्यादी मान्यवर उपस्थित होते . प्रकाशन सोहळा ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनंत देशमुख यांनी आपल्या भाषणात यामिनी ताईंच्या वाचन सातत्याचं आणि गांभीर्याचं कौतुक केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "जे वाचक वाचन, आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन हे चारही टप्पे पार करतात तेच चांगले समीक्षक होऊ शकतात." फक्त वाचनापुरतं मर्यादित न राहता, समिक्षक विषयाचा सखोल अभ्यास करतात आणि त्यांच्या लिखाणातून पुस्तकाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन जगाला देत असतात, असंही ते म्हणाले. चित्रकार विजयराज बोधनकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, "आर्थिक परिस्थिती, वय, टक्के ह्या अशा चुकीच्या अनेक चौकटी आपण आपल्यासाठी लावून घेत असतो आणि त्यातून बाहेर पडत प्रत्येकाने व्यक्त झाले पाहिजे तरच त्यातूनच चांगले लेखक तयार होतील." व्यक्त होताना प्रत्येकानं आपल्या मातृभाषेलाच प्राधान्य द्यावे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. " लेखक जगाकडे फक्त स्वतःच्या डोळ्यांनी नाही तर दृष्टीने पाहत असतो आणि म्हणूनच त्याला एक वेगळी अनुभूती येते आणि त्यातून एक दर्जेदार साहित्यकृती निर्माण होते. ती दृष्टी यामिनीताईंकडे आहे आणि म्हणूनच हे पुस्तक निश्चित वाचनीय असेल " असा विश्वास डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांनी या प्रकाशन सोहळ्यातील आपल्या मनोगतात व्यक्त केला. लेखिका यामिनी पानगावकर यांनीही ' रसिक प्रेक्षक - वाचकांच्या प्रतिसादाने आपण भारावून गेलो आहोत असे मनोगत व्यक्त केले. पुढे त्या असेही म्हणाल्या की वाचकांचे प्रेम आणि प्रतिसाद त्यांना यापुढेही अधिकाधिक सकस लेखन करण्यासाठी प्रोत्साहित करणारा आहे.
कार्यक्रमाचा समारोप विलास ठूसे ह्यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. विलास ठूसे व विदुला ठुसे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.