एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
By नितीन पंडित | Published: May 17, 2024 08:57 PM2024-05-17T20:57:47+5:302024-05-17T20:58:08+5:30
'या देशातील मंदिर मस्जिद सुरक्षित ठेवणे हे सर्वांची जबाबदारी, भाजपा दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.'
भिवंडी: देशाची राज्यघटना बदलण्यासाठी ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गरज आहे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या प्रचारासाठी पोगावं येथे आयोजित परिवर्तन सभेत बोलत होते. या सभेस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीचे खासदार संजय सिंह,खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,अनिल देशमुख,राजेश टोपे,आरपीआय सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख, ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे,भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे,जिल्हा प्रमुख विश्वास थळे,काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर यांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या देशातील मंदिर मस्जिद सुरक्षित ठेवणे हे सर्वांची जबाबदारी असताना भाजपा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील पवारांनी केला.
निवडणुकीत पराभव समोर दिसत असताना मोदी यांनी खोट्या केसेस मध्ये अडकवून मला कारागृहात टाकले,जामिनावर बाहेर असताना दिवसरात्र मेहनत करून २१ दिवसात भाजपाला पराभूत करूनच कारागृहात परत जाईल असा निर्धार व्यक्त करीत देशाला वाचविण्यासाठी मतदानाची भिक मागण्यासाठी मी भिवंडीत आलो आहे असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.दिल्लीत गरिबांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण, मोफत वीज,मोफत रुग्णालय उपचार मोफत औषध देण्याचे काम आम्ही करतो दिल्लीमध्ये ५०० मोहल्ला क्लिनिक बनवल्या मोदी यांनी देशभरात ५ हजार मोहल्ला क्लिनिक सुरू केल्या असता तर त्यांचा सन्मान केला असता.
रशियाचा नेता पुतीन याने विरोधकांना मारले कारागृहात टाकले,बांगलादेश व पाकिस्तान मध्ये सुध्दा असेच करुंन सत्ता हस्तगत केली ,भारताकडून जग शिकते पण मोदी बांगलादेश पाकिस्तान यांच्या कडून शिकून तसेच काम भारतात करू इच्छितात असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.नरेंद्र मोदी हे भयग्रस्त असून पक्षात ७५ वर्षांवरील नेत्यांना राजकारणातून निवृत्ती देणारे मोदी देखील पुढील वर्षी ७५ वर्षांचे होणार असल्याने ते मत मागत आहेत ते अमित शहा यांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी असा आरोप देखील केजरीवाल यांनी केला.