नीरज विश्वकर्माची कामगिरी : पूर्ण केले एव्हरेस्टिंग चॅलेंज, वाघोबा घाटात १०७ वेळा चढ-उतार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 09:27 AM2020-10-19T09:27:27+5:302020-10-19T09:28:59+5:30
‘रेस अक्रोस अमेरिका’ या नामांकित स्पर्धेची पात्रता स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. ३२ तासांमध्ये ६४१ किलोमीटरचा पल्ला त्याने या स्पर्धेत पार केला होता. पॅरिस ब्रेस्ट पॅरिस या फ्रान्समधील नामांकित स्पर्धेत देखील त्याने २०१९ साली भाग घेतला होता.
पालघर :पालघरच्या नीरज विश्वकर्मा याने पालघर-मनोर महामार्गावरील वाघोबा घाट सायकलिंगद्वारे १०७ वेेळा चढ-उतार करून १० हजार मीटरची उंची गाठत एव्हरेस्टिंग चॅलेंज पूर्ण केले आहे. नीरज विश्वकर्मा हा पालघरच्या टेंभोडे गावचा रहिवासी असून सध्या पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून नोकरी करत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून तो सायकलिंगचा सराव करीत असून तीन वर्षांपूर्वी डेक्कन क्लिफहँगर ही नामांकित स्पर्धा त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
‘रेस अक्रोस अमेरिका’ या नामांकित स्पर्धेची पात्रता स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. ३२ तासांमध्ये ६४१ किलोमीटरचा पल्ला त्याने या स्पर्धेत पार केला होता. पॅरिस ब्रेस्ट पॅरिस या फ्रान्समधील नामांकित स्पर्धेत देखील त्याने २०१९ साली भाग घेतला होता. तसेच ३०० किलोमीटर, ४०० किलोमीटर, ६०० किमी, १००० किलोमीटर असे सायकलिंगचे इव्हेंट तो दरवर्षी करत असतो. पुणे रेंडोनियर्स क्लबचा तो सदस्य असून या वर्षी १२०० किलोमीटर सायकलिंगचा टप्पादेखील त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. यापूर्वी देखील याच घाटात नीरजने एव्हरेस्टिंगचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. परंतु त्याने हार न मानता दुसऱ्या प्रयत्नात सलग २७ तास सातत्याने सायकलिंग करीत ३२७ किलोमीटर अंतर कापले व १० हजार १०३ मीटर उंचीचा पल्ला त्याने गाठला. १० हजार मीटरची उंची गाठणारा व एव्हरेस्टिंग करणारा नीरज विश्वकर्मा भारतातील दुसरा सायकलिस्ट ठरला असून याची नोंद 'एव्हरेस्टिंग हॉल ऑफ फेम' मध्ये करण्यात आली आहे.