खाजगी हॉस्पीटल मधील पेशन्ट आणि स्टॉफचे रिपोर्ट निगेटीव्ह, आनंद नगरच्या त्या आठ संशयीतांचेही रिपोर्ट निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 06:42 PM2020-04-01T18:42:14+5:302020-04-01T18:43:55+5:30
एकीकडे ठाणे महापालिका कोरोना बाधीतांच्या संपर्कात येत असलेल्या नागरीकांची तपासणी करीत असतांना आता वर्तक नगर भागातील त्या खाजगी रुग्णालयातील सर्वाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर कोपरी आनंद नगर भागातील त्या आठ जणांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
ठाणे : एकीकडे ठाण्यात मागील ४८ तासात एकही नवा रुग्ण कोरोनाचा आढळा नसतांना दुसरीकडे कोपरीतील आनंद नगर भागातील त्या महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ८ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच वर्तकनगर भागातील खाजगी रुग्णालयात उपाचर घेतलेल्या त्या रुग्णांच्या संपर्कातील ३७ जणांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु सावधगिरीचा उपाय म्हणून या सर्वांना क्वारन्टाइन करण्यात आले असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाण्यात कोरोनाचे आतापर्यंत १२ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु आता मंगळवारी दिवसभरात ठाण्यात कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. ही ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तर दुसरीकडे खरबदारीचे उपायही पालिकेकडून केले जात आहे. दरम्यान मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात उपाचार घेणाऱ्या वृध्द महिलेच्या संपर्कात आलेल्या कोपरी आनंद नगर भागातील ८ नागरीक त्या महिलेच्या संपर्कात आले होते. तसेच हेच ८ नागरीक या भागातील त्यांचे नातेवाईक आणि इतरांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे येथील तब्बल ६२ नागरीकांना पालिकेने घोडबंदर भागातील कासारवडली भागात क्वॉरन्टाइन करुन ठेवले आहे. त्यातील जे ८ नागरीक वृध्द महिलेच्या संपर्कात आले होते. त्यांचे रिपोर्ट सध्या निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे इतरांचे रिपोर्ट तपासणी करण्यात आलेली नाही. परंतु खबरदाराची उपाय म्हणून या सर्वांना क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे.
दुसरीकडे वर्तक नगर भागातील एका खाजगी रुग्णालयात एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. त्यालाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानुसार येथील स्टाफ आणि ९ नागरीकांना पालिकेच्या वतीने क्वॉरन्टाइन केले होते. परंतु आता त्यांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले असल्याची माहिती येथील खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. तसेच पालिकेनेही त्यांचे रिपोर्ट सध्या निगेटीव्ह असल्याचे सांगितले आहे. परंतु या सर्वांनाही क्वॉरन्टाइन करण्यात आले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे तुर्तास ठाणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, त्यात आता मागील २४ तासात कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. परंतु असे असले तरी पालिकेच्या माध्यातून खरबदारीचे उपाय केले जात आहेत.