पोलिसांच्या सूचनांकडे पालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:32 AM2018-08-25T00:32:17+5:302018-08-25T00:32:40+5:30
रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरतील, असे रस्ते, गल्ल्या व्यापून बेकायदा मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये, असे पोलिसांनी महापालिकेस कळवले आहे.
मीरा रोड : रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरतील, असे रस्ते, गल्ल्या व्यापून बेकायदा मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये, असे पोलिसांनी महापालिकेस कळवले आहे. परंतु, शहरात मंडप उभारणीची कामे सुरू झाली असताना पालिका डोळेझाक करत असल्याने आधी बेकायदा मंडप उभारू द्यायचा व नंतर धार्मिक मुद्दा पुढे करत कारवाई करायची नाही, असा फंडा अवलंबला जाण्याची शक्यता आहे.
परवानगी नसली तरी रस्ते, पदपथांवर सर्रास कमानी उभारल्या जातात. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात रस्त्याच्या एक तृतीयांश भागातच मंडपासाठी परवानगी देण्याचे न्यायालय व सरकारचे आदेश आहेत. परंतु, रस्त्यांवर खड्डे खोदून कमानी व मंडप बांधले जातात. मंडप, कमानी उभारून झाल्या की, मग धार्मिक मुद्दा पुढे करून पालिका संरक्षण देते. बेकायदा मंडप व कमानी उभारणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करत नाही. यामुळे आधीच शहरात वाहतूककोंडी होऊन रहदारीला अडथळा होत असताना मंडप व कमानींमुळे त्यात मोठी भर पडते.
अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या मार्गावर जागोजागी मोफत खाद्य व पेय पदार्थांचे स्टॉल तसेच राजकीय वा संस्थांचे स्वागतकक्ष बांधले जातात. यामुळे गर्दी होऊन अगदी चेंगराचेंगरी होते. उष्टं-खरकटं, कचरा तसाच टाकला जात असल्याने रस्त्यांचा उकिरडा होतो. पण, या सर्वांना राजकीय आशीर्वाद असल्याने महापालिकाही संरक्षण देते.
मोठ्या मूर्ती आणताना वा विसर्जनावेळी अपघात झाले आहेत. सरकारनेही उंच मूर्ती आणणाºया मंडळांना लहान मूर्ती बसवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आदेश दिले असताना पालिकेने तिलांजली दिली आहे.
या सर्व महत्त्वाच्या बाबींची गांभीर्याने दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांना पत्र देऊन १० कलमी मुद्यांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. रस्त्यावर व वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी तसेच विसर्जन मार्गावर स्टेज-मंडपाची परवानगी देऊ नये, असे स्पष्ट कळवले आहे.
या उपाययोजना करा
बेकायदा फेरीवाले, मोकाट जनावरे व उभी केलेली वाहने हटवा. मंडळांना लहान आकाराच्या मूर्ती आणण्याचे आवाहन करा. भार्इंदर पश्चिमेस रेतीबंदर येथे विसर्जनाची सोय करा, जेणेकरून मोठ्या मूर्तींचे विसर्जन तेथे करता येईल आणि गर्दी होणार नाही. खड्डे बुजवा, दिव्यांची दुरुस्ती करा, मार्गाावर अडथळा ठरतील, अशा झाडाच्या फांद्या छाटा, विसर्जन ठिकाणी जीवरक्षक, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल तैनात ठेवावे आदींचा उल्लेख कुलकर्णी यांनी केला आहे.