भिवंडीतील कामवारी नदीच्या प्रदूषणाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष; प्लास्टिक कचरा, केमिकलमुळे नदीची बनली गटार
By नितीन पंडित | Published: January 25, 2024 04:04 PM2024-01-25T16:04:30+5:302024-01-25T16:04:57+5:30
या नदीच्या स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन,प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.
भिवंडी: शहरालागत असलेल्या कामवारी नदीच्याप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.प्रतिबंधित प्लास्टिक कचरा व डाइंग सायजिंगचे दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने या नदीची सध्या गटार गंगा झाली आहे.या नदीच्या स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन,प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.
कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडी शहर सर्वत्र परिचित आहे.यंत्रमाग व्यवसायाबरोबरच कापडावर रंग प्रक्रिया करणाऱ्या डाइंग व सायजिंग देखील भिवंडीत मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत.शहरात व शहरालगत असलेल्या शेलार, मिठपाडा परिसरात देखील मोठ्या प्रमाणात डाइंग सायजिंग थाटण्यात आल्या आहेत.या डाइंग सायजिंग मधून निघणारे केमिकल मिश्रित दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कामवारी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे.
या नदीपात्रात दोन्ही बाजू कडील केमिकल युक्त पाणी थांबविण्याची गरज असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करीत नसल्याने कामवारी नदीची सध्या पुरता गटारगंगा झाली असून आता ही नदी मरणासन्न अवस्थेत आलेली आहे.दुर्दैव म्हणजे याची जबाबदारी सांभाळणारी यंत्रणा,सरकार अथवा स्थानिक महापालिका प्रशासन हे सर्वच याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत असल्याची खंत खुद्द राष्ट्रीय जलपुरुष मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ राजेंद्र सिंग यांनी या नदीच्या पाहणी दौऱ्या प्रसंगी व्यक्त केली होती.
गुरुवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत चला जाणूया नदीला या उपक्रमाबाबत मनपा मुख्यालयात मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला मनपा अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,जलनायिका डॉ.स्नेहल दोंदे, ठाणे मायनर इरिगेशनचे अधिकारी,वनपरिक्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण कल्याण विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी शहरालगत वाहणारी कामवारी नदी प्रदूषण मुक्त करून प्रवाहित करण्याचे काम जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे, जिल्हा नियोजन समितीमध्ये याकरिता निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे, लवकरच कामवारी नदी प्रदूषण मुक्त करून नदी पूर्व प्रवाहित करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे.