कुष्ठरुग्ण वसाहतीतील दवाखान्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:59 PM2019-09-05T23:59:00+5:302019-09-05T23:59:15+5:30
जानेवारीत पडझड : केडीएमसीच्या भोंगळ कारभाराचा फटका
कल्याण : पूर्वेतील कचोरे परिसरातील हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहतीत असलेल्या दवाखान्याच्या वास्तूची पडझड झाली आहे. त्यामुळे जागेअभावी फेब्रुवारीपासून शेजारील शाळेलगतच्या सभागृहात कुष्ठरुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, अजूनही दवाखान्याची दुरुस्ती करण्यासाठी अजूनही केडीएमसीला मुहूर्त मिळालेला नाही. राज्यमंत्र्यांचे पत्र तसेच वैद्यकीय विभागाने दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
हनुमाननगर येथील कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत १६० कुटुंबे वास्तव्याला आहेत. त्यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर, सध्या १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५९ रुग्णांचे दिव्यांगांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. अशा कुष्ठरुग्णांना दररोज मलमपट्टी करावी लागते. अन्यथा, रुग्णांच्या जखमांमधून बाहेर पडणाऱ्या जंतंूमुळे रोगाचा फैलाव होऊ शकतो.
कुष्ठरुग्णांची वाढती संख्या पाहता केडीएमसीने १९९३ मध्ये येथे एक स्वतंत्र दवाखाना उभारला. तेथे कुष्ठरुग्णांवर उपचार होत असत. परंतु, या दवाखान्याची आता जीर्ण अवस्था झाल्याने पुरती पडझड झाली आहे. त्यामुळे त्याची त्वरित डागडुजी करणे गरजेचे आहे. अतिधोकादायक अवस्थेतील या दवाखान्याचा स्लॅब कधीही कोसळण्याची भीती आहे. दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दवाखान्याची पडझड झाली. तेव्हापासून खबरदारी म्हणून हा दवाखाना शेजारच्या केडीएमसीच्या राजगुरू विद्यालयालगत असलेल्या सभागृहात हलवण्यात आला आहे. दवाखान्याची पडझड झाली तेव्हा त्याची डागडुजी करावी, अशी मागणी हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केडीएमसी आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच यासंदर्भात आयुक्तांना पत्र द्यावे, अशी विनंतीही त्यांनी चव्हाण यांना केली होती. त्यावर चव्हाण यांनी आयुक्तांना ६ फेब्रुवारीला पत्र पाठवून काम तातडीने करण्याबाबत आदेशही दिले होते. परंतु, अजूनही दवाखान्याची डागडुजी झालेली नाही. दरम्यान, डागडुजीसाठी त्याचा आराखडा तयार करून त्यासंबंधीचा प्रस्ताव वैद्यकीय आरोग्य विभागाने बांधकाम विभागाकडे पाठवलाही आहे.
दवाखान्याची धोकादायक स्थिती आयुक्त गोविंद बोडके यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आली होती. तेव्हा त्यांनीही तातडीने दुरुस्तीचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. दुसरीकडे आॅगस्टमध्ये महापौर विनीता राणे यांनीही या वसाहतीला भेट दिली. त्यावेळी दवाखान्याची दुरवस्था त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आली होती. पण, अद्याप कार्यवाही झालेली नाही. यावरून दवाखान्याच्या पडझडीकडेही महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे.
...तर भीक मागून निधी देऊ : केडीएमसीने आम्हाला वाºयावर सोडले आहे. महापालिकेकडे निधी नसल्यास आम्ही तो भीक मागून जमा करून देऊ, पण दुरुस्तीचे काम झाले पाहिजे, अशी भावना कुष्ठरुग्णांची झाली आहे, असे परखड मत गायकवाड यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. दरम्यान, यासंदर्भात बोडके यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.