भिवंडीतील मेट्रो प्रकल्पातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर; कॉलम सळईचा सांगाडा कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 05:44 PM2021-11-13T17:44:35+5:302021-11-13T17:45:04+5:30
पाच कामगार जखमी, नजीकच्या रुग्णालयात करण्यात आलं दाखल.
नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडीत ठाणे अंजुरफाटा कल्याण नाका ते कल्याण असा मेट्रो पाच प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. अंजुरफाटा येथे मेट्रो प्रकल्पाचे कॉलम भराइचे काम सध्या प्रगती पथावर सुरु आहे. या ठिकाणी काँक्रेट पिलर साठी उभारलेला लोखंडी सळईचा सांगाडा अचानक कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी अंजुरफाटा नाक्याजवळ मराठा पंजाब हॉटेल शेजारी घडली. या दुर्घटनेत पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले असून जखमी कामगारां याच ठिकाणी असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे.
भिवंडीत मागील तीन वर्षांन पासून मेट्रो पाच प्रकल्पाचे काम सुरु आहे. मुंबई ठाण्यात परंतु ज्या पद्धतीने आणि सुरक्षेच्या तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करून मेट्रोचे काम सुरु असते तशा प्रकारची कोणतीही दक्षता भिवंडीत मेट्रो प्रकल्पात घेण्यात आलेली दिसत नाही. मेट्रो पाच प्रकल्पाच्या हलगर्जी कारभाराबाबत भिवंडीतील अनेक पक्ष संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याने या प्रकल्पामुळे भिवंडीकरांची वाहतूक सुधारणार की आणखी त्रासदायक होणार अशी शंका नागरिक व्यक्त आहेत. असं असतानाच शनिवारी लोखंडी सळईचा कॉलम सांगाडा कोसळल्याने मेट्रो पाच प्रकल्पातील हलगर्जीपण चव्हाट्यावर आला असून या दुर्घटनेत पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सळईचा पडलेला सांगाडा क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे काही काळ अंजुरफाटा मानकोली व अंजुरफाटा ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.