नेपाळच्या गायिकेचा साडेसहा कोटींना गंडा; किडनी विकून पैशांचे दाखवायचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:25 AM2022-01-21T10:25:21+5:302022-01-21T10:31:10+5:30

गायिकेने देशभरातून फसवणूक करून साडेसहा कोटी रुपये अवैध मार्गाने गोळा केल्याचे उघड झाले

Nepali singer looted Rs 6.5 crore | नेपाळच्या गायिकेचा साडेसहा कोटींना गंडा; किडनी विकून पैशांचे दाखवायचे आमिष

नेपाळच्या गायिकेचा साडेसहा कोटींना गंडा; किडनी विकून पैशांचे दाखवायचे आमिष

googlenewsNext

- पंकज पाटील

अंबरनाथ : अंबरनाथच्या महिलेला किडनीच्या मोबदल्यात चार कोटी देण्याचे आमिष दाखवणाऱ्या नेपाळच्या गायिकेने देशभरात अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. या गायिकेने देशभरातून फसवणूक करून साडेसहा कोटी रुपये अवैध मार्गाने गोळा केल्याचे उघड झाले. या गायिकेच्या साथीदाराच्या  बँक स्टेटमेंटवरून ही बाब उघड झाली असून पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अंबरनाथच्या रहिवासी कल्पना मगर यांची नेपाळची गायिका रबिना बाबी यांनी तब्बल आठ लाखांची फसवणूक केली. रबिना यांनी मगर यांची किडनी चार कोटी रुपयाला विकण्याचे आश्वासन दिले होते. आपल्याला चार कोटी रुपये मिळणार या आशेने मगर भूलथापांना बळी पडल्या. नोंदणी आणि इतर कामकाजासाठी रबिना यांनी मगर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने आठ लाख रुपये वसूल केले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मगर यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने थेट दिल्ली गाठत रबिना यांचा शोध घेतला. 

एवढेच नव्हे तर रबिना यांनी ज्या बँक खात्यात पैसे जमा करायला सांगितले होते तो बँक खातेधारक आणि रबिना यांचा साथीदार अरविंद कुमार याची माहिती काढली. त्यांच्या बँक खात्यात  देशभरातून साडेसहा कोटी रुपये जमा झाल्याचे उघड झाले. देशभरात फसवणूक झालेल्या अनेकांनी याच बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. 

एवढी मोठी गंभीर बाब उघड झाल्यानंतरही अंबरनाथच्या पोलिसांनी या मुख्य आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. या आरोपींना मोकाट सोडण्यात आल्याने देशात पुन्हा अनेकांची फसवणूक होण्याचा धोका  आहे.

आरोपी पसार होण्याची शक्यता
पैसे लुबाडणारी महिला आणि तिचा साथीदार हे दिल्लीच्या शालीमार बाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत आहेत. या आरोपींचा शोध खुद्द फिर्यादी आणि त्यांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याने घेतला. मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केलेली नाही.
शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केल्यास देशभरातील इतर नागरिकांची झालेली फसवणूक  लक्षात येऊ शकते. मात्र आरोपीला अटक करण्यास विलंब होत असल्याने हे आरोपी दिल्लीतून पसार होण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या शालीमार बाग पोलिसांनी संबंधित फसवणूक करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून लेखी स्वरूपात पैसे परत देण्याचे हमीपत्र घेतले होते. मात्र तरीदेखील अंबरनाथच्या महिलेला तिचे पैसे परत मिळाले नाहीत.

Web Title: Nepali singer looted Rs 6.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.