चुलत्याचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेपेची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल
By जितेंद्र कालेकर | Published: September 27, 2023 09:35 PM2023-09-27T21:35:52+5:302023-09-27T21:36:21+5:30
वाट्याला खराब जमीन दिल्याने जव्हारमधील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आपल्या वाटणीला खराब जमीन दिल्याच्या रागातून अंबू बुधर (७५, रा. बेहडपाडा, वावर वांगणी, जव्हार, जि. पालघर) या चुलत्याचा खून करणाऱ्या रामदास बुधर (४५, रा. बेहडपाडा, पालघर) या पुतण्याला जन्मठेपेची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने बुधवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे. अंबु हे वावर वांगणी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नवसू यांचे वडिल होते.
यातील अंबू आणि रामदास या काका पुतण्यांमध्ये नेहमीच शेताच्या जागेतून वाद होत होते. त्यातच आपल्या वाट्याला चुलत्याने खराब जमीन दिल्याची सल रामदासच्या मनात होती. त्यांची बेहेडगावच्या हद्दीतच रस्त्यालगत १७ एकर सामायिक जमीन आहे. ही जमीन त्यांनी आपसात वाटून घेतली होती. त्यातील अर्धी जमीन अंबू आणि त्यांची मुले झिपर व नवसू हे कसत होते. अर्धी जमीन रामदास आणि त्याचा भाऊ राजाराम बुधर हे कसत होते. आपल्या वाट्याला खराब जमीन दिल्याच्या रागातून रामदास याने ५ मार्च २०१६ रोजी पहाटे ६.३० ते ६.४५ वाजण्याच्या दरम्यान बेहेडपाड्यातील अंबू यांच्या शेतावर जाऊन कुऱ्हाडीच्या बाेथट बाजूने अंबू यांच्या तोंडावर आणि खांद्यावर, छातीवर, पोटावर जबर प्रहार केले. यातच त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी रामदास याला १० मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. याच खटल्याची सुनावणी ठाण्याच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. रचना आर. तेहरा यांच्या न्यायालयात २७ सप्टेंबर रोजी झाली. यामध्ये संध्या म्हात्रे यांनी सरकारी वकील म्हणून पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर गुन्हयात आरोपीला दोषी मानण्यात आले. पोलिस निरीक्षक के. व्ही. नाईक यांनी तपासी अधिकारी म्हणून तर पोलिस नाईक पाचोरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.