उल्हासनगरमधील नेताजी उद्यानाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:09 AM2019-06-17T00:09:45+5:302019-06-17T00:10:05+5:30
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
उल्हासनगर : शहरातील उद्यान व उद्यान दुरूस्ती, नूतनीकरणासाठी ३ कोटीच्या निधीची तरतूद करूनही उद्यानाची दुरवस्था झाली आहे. नेताजी उद्यानाचे काम अर्धवट असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरातील उद्यानाची दुरूस्ती, नूतनीकरणावर कोटयवधींचा निधी खर्च करूनही त्यांची दुरवस्था झाली. कॅम्प नं-५ येथील चांगल्या स्थितीतील नेताजी उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने सुरू केले. नागरिकांना चालण्यासाठी रस्त्याचे रूंदीकरण करून लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहेत. मात्र इतरत्र खोदून ठेवल्यामुळे दुरवस्था झाली आहे. उद्यानाच्या नूतनीकरणासाठी स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री प्रयत्न करत आहेत. मात्र उद्यानाचे काम अर्धवट टाकले कसे? या प्रश्नाचे उत्तर बांधकाम विभागाकडे नसून वाढीव निधीसाठी उद्यानाचे काम थांबल्याची चर्चा आहे.
नेताजी उद्यानाच्या नूतनीकरण व दुरूस्तीवर दोन वर्षापूर्वी लाखो रूपये खर्च केला होता. तसेच खुली व्यायामशाळा, लहान मुलांसाठी खेळणी बसवणे, झाडे लावणे, बसण्यासाठी सिमेंटची बाकडे बसविण्यात आली. मात्र जुन्याच कामावर नवीन बांधकाम झाल्याचे दाखवल्यावर उद्यानाचे काम वादात सापडले. राज्य सरकार व महापालिकेकडून नूतनीकरण व दुरूस्तीसाठी प्रत्येकी ३ कोटी असा एकूण ६ कोटींच्या निधीची तरतूद केली होती. सकाळ-संध्याकाळ हजारो नागरिक ज्या नेताजी उद्यानाचा वापर करतात त्याची दुरूस्ती व नूतनीकरणाऐवजी व्हीनस चौकातील रस्त्यावर तसेच गोलमैदानच्या जागेत कोटयवधींचा निधी खर्च करून लहानसे उद्यान विकसित केले.
सत्ताधारी गप्प
शहरातील उद्यानाची दुरूस्ती व नूतनीकरणावर तब्बल ६ कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र मुख्य उद्यानावर खर्च करण्या ऐवजी नवीन उद्याने विकसित करून कोट्यवधींचा खर्च करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपसह शिवसेना, साई पक्ष, ओमी टीमच्या नगरसेवकांनी याबाबत मूग गिळून गप्प आहेत.
निधीअभावी कामबंद
नेताजी उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम ६ महिन्यांपूर्वी सुरू केले. नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या रस्त्याचे रूंदीकरण करून लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली. मात्र याव्यतिरिक्त इतर कामांसाठी निधी अपुरा पडला असून निधी उपलब्ध होताच उद्यानाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया शहर अभियंता महेश शितलानी यांनी दिली आहे.