मातृभाषेला कधीच विसरू नका- प्रवीण दवणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:38 PM2018-08-22T23:38:30+5:302018-08-22T23:38:59+5:30

कल्याणमध्ये सीकेपी संस्थेतर्फे राज्यभरातील गुणवंतांचा गौरव

Never forget the mother tongue: Praveen Dave | मातृभाषेला कधीच विसरू नका- प्रवीण दवणे

मातृभाषेला कधीच विसरू नका- प्रवीण दवणे

googlenewsNext

कल्याण : ‘विद्यार्थ्यांनी फक्त क्रमिक शिक्षण न घेता आवडीच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर पोहोचण्यासाठी झटले पाहिजे. इंग्रजी माध्यमाची कास धरताना मातृभाषेला कधीही विसरू नका’, असे आवाहन प्रख्यात कवी, लेखक, प्रवीण दवणे यांनी केले.
सीकेपी संस्थेतर्फे पहिलाच राज्यस्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच येथे झाला. यावेळी दवणे बोलत होते. या सोहळ्याला राज्यभरातून विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहावी, बारावी, पदवी, अभियांत्रिकी, विद्यावाचस्पती, वास्तुविशारद इत्यादी क्षेत्रांत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या माजी शिक्षणाधिकारी डॉ. कल्पना चित्रे, विख्यात समुपदेशक बिपिन देशमुख, सीकेपी संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे, राजेश देशपांडे इत्यादी उपस्थित होते.
दवणे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी कुठलेही क्षेत्र निवडू देत, परंतु त्याच क्षेत्रात त्यांनी सर्वाेच्च पदके प्राप्त करण्याची ईर्षा मनात ठेवली पाहिजे. ती पूर्ण करण्यासाठी त्यांची संघर्ष करण्याची तयारी असली पाहिजे. बहुसंख्य विद्यार्थी दहावी, बारावी, उच्च शिक्षण घेतात, हे खरे आहे. परंतु, बहुसंख्य विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकलेले असल्याने त्यांना मातृभाषेतील गोडवा तसेच महनीय व्यक्तींचा विसर पडत आहे. दैनंदिन जीवनात जेवढा जास्त मातृभाषेचा उपयोग कराल, तेवढेच जीवन समृद्ध बनते, अन्यथा मातृभाषेशिवाय जीवन अर्थहीन आहे.’
डॉ. चित्रे म्हणाल्या, ‘पीएच.डी. करताना केवळ परिश्रम लागत नाहीत. संयम हे महत्त्वाचे अस्त्र ज्यांच्याजवळ असते, अशा विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही.’ तर, देशमुख म्हणाले, ‘पालकांनी कुठल्याही प्रकारची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. केवळ पारंपरिक शिक्षण घेऊ नका. विविध प्रकारची क्षेत्रे खुली असून त्यात करिअर करावे.’

Web Title: Never forget the mother tongue: Praveen Dave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.