ठाणेकरांचा प्रवास होणार गारेगार; परिवहनचा ४८७.६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर, तिकीट दर होणार कमी

By अजित मांडके | Published: February 17, 2023 02:25 PM2023-02-17T14:25:39+5:302023-02-17T14:26:50+5:30

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने मागील वर्षी २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता ६२० कोटी ९० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता.

New bus in service of Thanekar; Transport budget of Rs 487.69 crore presented, ticket price will be reduced | ठाणेकरांचा प्रवास होणार गारेगार; परिवहनचा ४८७.६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर, तिकीट दर होणार कमी

ठाणे महानगर ट्रांसपोर्टच्या वतीने अर्थसंकल्प सादर करताना. (फोटो : विशाल हळदे)

googlenewsNext

ठाणे : ठाणेकरांच्या सेवेत टप्याटप्याने नवीन इलेक्ट्रीक बस प्रवासासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार या बसचे तिकीटदेखील कल्याण, नवीमुंबईच्या धर्तीवर निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार इलेक्ट्रीक बसचे तिकीट दर कमी होणार असल्याने ठाणेकरांचा प्रवास स्वस्तात आणि गारेगार होणार आहे. याशिवाय प्रवासी संख्या वाढविण्याबरोबर, नवनवीन मार्गांचा देखील समावेश असेल. यासाठी पर्यावरणपुरक १२३ बसचा समावेश करीत, ठाणे परिवहन सेवेचा २०२३ - २४ चा ४८७.६९ कोटींचा मुळ अर्थसंकल्प परिवहनचे व्यवस्थापक भेरे यांनी परिवहन समितीला सादर केला.

यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. तर पर्यावरणाच्या दृष्टीकोणातून शुन्य उत्सर्जन - प्रदुषण असलेल्या १२३ इलेक्ट्रीक बस व २० सीएनजी मिडी बस नव्याने परिवहनच्या उपक्रमात दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत परिवहनच्या ताफ्यात ३२९ बस सून आगामी काळात १२३ बसपैकी परिवहनच्या ताफ्यात सध्या ११ बस दाखल झाल्या आहेत. जुलै पर्यंत सर्व १२३ इलेक्ट्रीक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून ठाणेकरांना ४७२ बस उपलब्ध होणार आहेत.

वाहतुकीपासून अपेक्षित उत्पन्न -
प्रवासी भाडे - प्रवासी भाड्यापोटी सध्या अस्तित्वात असलेल्या बस आणि नव्याने दाखल होणाऱ्या बस असे मिळून १३० कोटी ५८ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच जाहीरात, पोलीस ग्रॅन्ट व महापालिकेकडून दिलेल्या सवलती पोटी दिलेले अनुदान हे अपेक्षित उत्पन्नात धरण्यात आले आहे. तर जेष्ठ नागरीक ५० टक्के, दिव्यांग १०० टक्के, विद्यार्थी ५० टक्के, ७५ वर्षावरील जेष्ठ नागरीक, स्वांतत्र्य सेनिकांची विधवा पत्नी व सोबत सह प्रवासी, तसेच इतरांना देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे परिवहनवर ताण पडणार आहे. त्याची भरपाई म्हणून अनुदानातून मिळावी यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

लोकसंख्येच्या मानाने बस कमी -
१ लाख लोकसंख्येमागे ३० बस अपेक्षित आहेत. त्यानुसार ठाणे शहराची सध्याची २३ लाख लोकसंख्या लक्षात घेतल्यास ठाणेकरांना ७९३ बसची आवश्यकता असल्याचे अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले आहे.

महसुली खर्चाबाबत -
वेतन व भत्ते खर्च परिवहन सेवेतील अधिकारी, कर्मचारी वेतन व निवृत्तीधारकांचे पेन्शन, थकबाकी व इतर देणीपोटी २७७ कोटी १६ लाख व इतर प्रशासकीय खर्चासाठी १ कोटी ४५ लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

सेवा निवृत्ती निधी - 
जानेवारी २०२३ अखेर ९०१ कर्मचारी व २०२३-२४ या आर्थिक वर्षात १२३ कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून १०२४ कर्मचाऱ्यांना उपदान, रजावेतन, व मासिक निवृत्तीवेतन असे सरासरी ३९ कोटी १३ लाख वार्षिक खर्च होणार आहे.

कर्मचारी थकबाकी देणी -
परिवहन सेवेकडील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला असून त्यापोटी व इतर थकीत द्यावी लागणारी फरकाच्या रकमेसह एकूण थकीत देणी ६८ कोटी ६६ लाख एवढी प्रलंबित आहे. वाहन दुरुस्ती व निगा देखभालीसाठी ६ कोटी ४५ लाख तरतूद, डिझेल सिएनजी पोटी ८ कोटी १४ लाख, सरकारी कर ७ कोटी १९ लाख, पुढील वर्ष भराव्या लागणाऱ्या प्रवासी कर ३ कोटी २४ लाख,बालपोषण अधिकारी १ कोटी ८ लाख, वाहनांचा विमा २ कोटी १७ लाख आदी तरतूद करण्यात आली आहे.

जीसीसी अदायगी - जेएनएनयुआरएम अंतर्गत प्राप्त झालेल्या २४० तसेच १२३ नवीन इलेक्ट्रीक बस अशा एकूण ३६३ बस जीसीसी तत्वावर चालविल्या जात आहेत. त्यासाठी वार्षिक १५५ कोटी ९१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, बस फेऱ्या वाढविण्याबाबत उपाय योजना -
सध्या शहरात विविध प्रकारची कामे सुरु आहेत. त्यामुळे बस फेऱ्या कमी होत आहेत, त्यासाठी ठाणे वाहतुक पोलीस यांच्याकडे समन्वय साधून कोंडी सोडविण्याबाबत उपाय योजना करण्याबरोबर नवीन १२३ इलेक्ट्रीक आणि २० सीएनजी बस या नवीन रुटवर शोधून चालविण्यावर भर दिला जाणार आहे.

प्रवासी संख्या वाढविण्यावर भर -
परिवहनचे १०४ मार्ग आहेत. सॅटीस येथे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मेगाफोनद्वारे सोडण्यात येणाऱ्या बसची माहिती देणे, गर्दीच्या वेळेत पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, खाजगी बसला आळा घालणे, परिवहनच्या ताफ्यात अधिक संख्येने मिडी बस घेऊन त्या छोट्या मार्गावर चालविणे, खाजगी बस ऐवजी परिवहनच्या बसचा वापर करावा यासाठी आवाहन करणे.

महापालिकेकडून अनुदानाची मागणी -
ठाणे परिवहन सेवेने मागील वर्षी ४६० कोटी ५४ लाखांचे अनुदान मागितले होते. यंदा अनुदानापोटी ३२० कोटी ६ लाखांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये वेतन खर्च, पेन्शन,वैद्यकीय भत्ता, रजा प्रवास भत्ता, सेवानिवृत्ती कर्मचारी थकबाकी, पुरवठा दारकांची देयके, बसमधून प्राप्त होणाऱ्या उत्पन्न व अदायगी मधील तूट, तिकीट मशीन आदींच्या खर्चाचा त्यात समावेश आहे.

भाडेवाढ नाही -
ठाणे परिवहन सेवेने २०१५ नंतर अद्याप नव्याने भाडेवाढ केलेली नाही. यंदा देखील कोणत्याही स्वरुपाची भाडेवाढ करण्यात येणार नसल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. परंतु त्यामुळे परिवहनचे उत्पन्न कमी होत असून खर्च वाढत आहे. त्यात आता परिवहनच्या ताफ्यात नव्या १२३ इलेक्ट्रीक बस उपलब्ध होणार आहेत. त्यांचे तिकीट दर कल्याण आणि नवीमुंबईच्या धर्तीवर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्याचे तिकीट दर लक्षात घेता, नव्याने येणाऱ्या इलेक्ट्रीक बसचे तिकीट दर हे कमी असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: New bus in service of Thanekar; Transport budget of Rs 487.69 crore presented, ticket price will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.