जहाल हिंदुत्ववाद्यांचे नवे केंद्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:27 AM2019-01-17T00:27:37+5:302019-01-17T00:27:45+5:30

शस्त्रे निवडणुकीकरिता की अन्य कारणास्तव : डोंबिवलीतील शस्त्रग्राहक रडारवर

A new center of Hindu activism? | जहाल हिंदुत्ववाद्यांचे नवे केंद्र?

जहाल हिंदुत्ववाद्यांचे नवे केंद्र?

Next

डोंबिवली : फॅशनेबल साहित्यविक्रीच्या नावावर शस्त्रविक्री करणारा भाजपाचा शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याला कल्याण गुन्हे शाखेने अटक केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या घातपाती कारवायांचे डोंबिवली हे नवे केंद्र तर निर्माण झाले नाही ना, अशी चर्चा राजकारणात रंगू लागली आहे. कुलकर्णी हा डोंबिवली भाजपाचा शहर उपाध्यक्ष तर आहेच, त्याचबरोबर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवकही आहे. याखेरीज, त्याचे अन्य कोणकोणत्या हिंदुत्ववादी संघटना व नेत्यांसोबत संबंध आहेत, हेही पोलिसांनी तपासावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र सुसंस्कृत, सुशिक्षित सांस्कृतिक नगरी असलेले डोंबिवली शहर जहाल हिंदुत्वाचा भयाण चेहरा होणार असेल, तर ते घातक असेल, असे शहरातील जाणकारांचे म्हणणे आहे.


मानपाडा रोडवर ‘तपस्या हाउस आॅफ फॅशन’ नावाचे दुकान कुलकर्णी याने थाटले होते. या दुकानात फॅशनेबल वस्तू विकण्याऐवजी शस्त्रविक्री केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या गुन्हे शाखेने दुकानावर धाड टाकली. बंदुका, चॉपर, तलवारी, कोयते अशी विविध प्रकारची हत्यारे कुलकर्णी याच्या दुकानात आढळली. इतका मोठा शस्त्रसाठा पाहून पोलीसदेखील अवाक झाले. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात व शेजारील कर्नाटकात नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी किंवा गौरी लंकेश अशा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. या हत्यांकरिता जहाल हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून अटक केली आहे. त्यामुळे कुलकर्णी याचे हे शस्त्रभांडार जहाल हिंदुत्ववादी संघटनांचे डोंबिवली हे नवे केंद्र बनवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल तर नव्हे ना, अशी शंका व्यक्त होत आहे.


याखेरीज, दुसरी शक्यता अशी आहे की, राज्यात भाजपा-शिवसेना युती झाली नाही, तर शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाबरोबर दोन हात करण्याची वेळ भाजपावर येणार आहे. भाजपाने अनेक दबंग नेते पक्षात घेतले आहेत. येत्या निवडणुकीत भाजपाच्या या दबंग नेत्यांना व कार्यकर्त्यांना लढण्याकरिता शस्त्र पुरवण्याकरिता तर ही व्यवस्था केली नाही ना, या अंगाने पोलिसांनी तपास करणे अपेक्षित आहे.

कुलकर्णी याने कोणाला ही शस्त्रे विकली, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित असला, तरी याच अंगाने पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. ही शस्त्रे क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याची कबुली कुलकर्णी याने पोलिसांना दिली आहे. डोंबिवलीत विदेशी शस्त्र वापरण्याची फॅशन तरुणाईत दिसून येते. त्यामुळे कुलकर्णीने ही शस्त्रे तरुणांना विकली असावीत, असे बोलले जात आहे. डोंबिवलीतील गुन्हेगारी वाढत चालली आहे. डोंबिवलीत गेल्या दोनतीन वर्षांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांची पार्श्वभूमी पाहता अशा पद्धतीने आणलेल्या शस्त्रास्त्रांच्या जोरावर गुंडगिरी केली जात असावी, अशी चर्चा सुरू आहे. पोलिसांनी कुलकर्णी याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून त्याच्याकडून मिळालेली शस्त्रे जप्त केली.
डोंबिवलीतील टिळकनगर या लोकवस्तीमधील इमारतीत कुलकर्णी राहतो. कुलकर्णी याचा स्वभाव शांत असल्याचा दावा त्याचे शेजारीपाजारी करतात. त्याच्याकडे शस्त्रसाठा मिळाल्याच्या या बातमीबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

कारवाईबाबत भाजपाचे मौन
भाजपाचे पदाधिकारी शशिकांत कांबळे यांच्याकडे याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कुलकर्णी हे भाजपाचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्या या प्रकरणाविषयी अधिक माहिती नाही. त्याच्याविरोधात काय कारवाई करणार, या प्रश्नावरही मात्र भाजपाने मौन बाळगले आहे.

सोशल मीडियावर भाजपा लक्ष्य
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कुलकर्णीच्या कृत्याने डोंबिवलीची चाल, चित्र आणि चेहरा भाजपाने बिघडवला, अशी टीका केली. डोंबिवलीत भाजपाने अखिल भारतीय शस्त्र प्रदर्शन आयोजित केले होते का, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आनंदी आनंद गडे, शस्त्रेच शस्त्रे चोहीकडे, अशी काव्यात्मक टीका सोशल मीडियावर दिसून आली.

भाजपाला दंगल घडवायची होती का?
भाजपाच्या डोंबिवली शहर उपाध्यक्षाला शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी अटक केल्याने या हत्यारांचा वापर करून भाजपाला दंगली घडवायच्या होत्या का, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व त्याने ही शस्त्रे कोणाकडून घेतली आणि कोणाला विकली, कुलकर्णी याचा सूत्रधार कोण, याचाही छडा लावला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: A new center of Hindu activism?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा