जिल्ह्यात सात कोटी खर्चून ७१ शाळांमध्ये नव्या वर्गखोल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:59+5:302021-06-10T04:26:59+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नव्या ७१ वर्गखोल्या उभारण्यासह १४० शाळांतील खोल्या व शाळा इमारतींचीही दुरुस्ती केली जाणार ...
ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नव्या ७१ वर्गखोल्या उभारण्यासह १४० शाळांतील खोल्या व शाळा इमारतींचीही दुरुस्ती केली जाणार आहे. नव्या वर्गखोल्या बांधण्यासाठी सात कोटी, तर शाळा दुरुस्तीवर चार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या माध्यमातून शाळांना नवा साज देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती सुभाष पवार यांनी दिली.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांचाच मुख्य आधार आहे. त्यातून या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. गेल्या वर्षापासून शाळा बंद असल्या, तरी अनेक शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांचे नुकसान झाले होते. मध्यंतरी काही दिवसांसाठी शाळा उघडल्यावर दुरुस्तीची गरज स्पष्ट झाली होती. मात्र, जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे ती केली नव्हती. मात्र, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर शाळा उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पवार यांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून घेतला.
नव्या ७१ वर्गखोल्यांसाठी सात कोटी एक लाख २८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार शहापूर तालुक्यात ३१, मुरबाड तालुक्यात १९, भिवंडी तालुक्यात १३, अंबरनाथमध्ये पाच आणि कल्याणमध्ये चार वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत. या खोल्यांच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे.
- शाळा दुरुस्तीवर चार कोटींचा खर्च
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या १४० शाळांची दुरुस्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यासाठी तीन कोटी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या निधीत वर्गखोल्यांच्या दुरुस्तीबरोबरच शाळेच्या इमारतीचींही दुरुस्ती केली जाईल. गेल्यावर्षी समग्र शिक्षा अभियानाद्वारे शाळा दुरुस्तीला मंजुरी मिळाली होती. मात्र, निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे यंदा सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असे पवार यांनी सांगितले. या प्रक्रियेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संतोष भोसले यांचेही साह्य झाले.