नव्या काँक्रिट रस्त्यांवर अडथळे कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:13 AM2019-04-19T00:13:21+5:302019-04-19T00:13:30+5:30
ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे जोशी हायस्कूल आणि बावनचाळ परिसरांतील वाहनांची वाहतूक वाढली आहे.
डोंबिवली : ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे जोशी हायस्कूल आणि बावनचाळ परिसरांतील वाहनांची वाहतूक वाढली आहे. पश्चिमेतील पुलानजीकच्या तीन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आता त्यावरून वाहने जाऊ लागली आहेत. मात्र, जेथे हे रस्ते अन्य रस्त्यांना जोडले जातात, तेथे मातीचे ढिगारे आहेत. तसेच दोन्ही रस्त्यांची पातळीही समसमान नाही. त्यामुळे वाहनचालकांपुढील अडथळे कमी झालेले नाहीत.
ठाकुर्ली उड्डाणपूल मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुला करण्यात आला. उड्डाणपुलामुळे का होईना रेल्वेच्या हद्दीतील बावनचाळ परिसरातील रस्त्यांच्या कामाला चालना मिळाली आहे. प्रारंभी या परिसरातील रस्त्यांना डांबरीकरणाचा साज चढवण्यात आला होता. त्यानंतर, आता रेल्वेने चार महिन्यांपासून रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. प्रारंभी दोन रस्त्यांची कामे हाती घेतली होती. त्यामुळे चिंचोळ्या गल्लीतून कच्च्या रस्त्यावरून वाहनांना वाट काढावी लागली होती. मात्र, या दोन्ही रस्त्यांची कामे संथगतीने का होईना पूर्ण झाली. परंतु, उड्डाणपूल उतरल्यानंतर उजवीकडे जाणाºया नव्याने झालेल्या काँक्रिट रस्त्यावर मधोमध उभे असलेले विजेचे लोखंडी खांब अजूनही हटवलेले नाहीत. तरीही, हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यापाठोपाठ पुलासमोरील रस्त्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. हा रस्ता बंद असताना वाहतुकीसाठी त्याच्या बाजूने पर्यायी रस्ता दिला होता. ओबडधोबड आणि धुळीचा असल्याने तो रस्ता गैरसोयीचा ठरत होता. अखेर, या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने तो वाहनांसाठी खुला केला आहे.
मातीचे ढिगारे, उंचसखल पातळीमुळे दुचाकी व छोट्या वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. धुळीच्या त्रासातून मुक्तता झाली असली तरी नव्या काँक्रिट रस्त्यांवर अडथळे कायम असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
>मार्गदर्शक फलक, प्रखर दिवे हवेत
रेल्वेने रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले असले, तरी या रस्त्यांवर आणि पुलावर पश्चिमेकडे मार्गदर्शक फलक नाहीत. त्यामुळे ते लावण्याची मागणी होत आहे. वाहनचालक सध्या वेगाने वाहने हाकत असल्याने गतिरोधक बसवावेत. तसेच प्रखर दिवे लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून
होत आहे.