दहावीचा नवा अभ्यासक्रम :पुढील वर्षी ‘घोकंपट्टी’चे ९५ टक्के विसरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:12 AM2018-06-13T04:12:41+5:302018-06-13T04:12:41+5:30
आमच्या मुलाला ९२ टक्के मिळाले तर त्या पलीकडच्या मुलास ९५ टक्के मिळाले ही ऊर अभिमानाने भरून येणारी वाक्ये पुढील जून महिन्यात दहावीच्या निकालानंतर कानावर पडणार नाहीत.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली - आमच्या मुलाला ९२ टक्के मिळाले तर त्या पलीकडच्या मुलास ९५ टक्के मिळाले ही ऊर अभिमानाने भरून येणारी वाक्ये पुढील जून महिन्यात दहावीच्या निकालानंतर कानावर पडणार नाहीत. कारण ‘घोकंपट्टी’चे ९५ टक्के दहावीच्या नव्या अभ्यासक्रमामुळे आता विसरावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती हीच कसोटी असेल व त्याकरिता पुरेसा वेळ आहे किंवा कसे याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यात मतमतांतरे आहेत.
नव्या परीक्षा पद्धतीनुसार, एक परिच्छेद दिला जाईल. त्या परिच्छेदाचे आकलन करून त्यावरील उत्तरे विद्यार्थ्याना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आकलनशक्तीवर अधिक जोर द्यावा लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत घोकंपट्टी करून गुणांचा पाऊस पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना आकलनशक्तीच्या बळावर गुण मिळवताना झगडावे लागणार आहे.
टिळकनगर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका रेखा पुणतांबेकर म्हणाल्या की, नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना विषय समजल्याशिवाय ते उत्तरे लिहू शकत नाही. घोकंपट्टी बंद झाल्यामुळे शाळांना आपली अध्यापन पद्धती बदलावी लागणार आहे. विद्यार्थी विचार करतील असे प्रश्न विचारावे लागतील. गटागटाने त्यांच्याकडून उत्तरे काढून घ्यावी लागतील. एखाद्या व्यक्ती शिकलेली नसते पण तिचे व्यवहारज्ञान चांगले असते. तसेच विद्यार्थ्यांना विषय समजून घ्यावा लागणार आहे.
विद्यानिकेतन स्कूलचे संस्थापक विवेक पंडित म्हणाले की, विद्यार्थ्यांचे ज्ञान हे त्यांच्या आकलन क्षमतेवर असेल. आकलन क्षमतेवर आधारित गुणवत्ता ठरवण्याचे हे पहिले वर्ष आहे. त्यामुळे ते चाचपणीत जाईल. एकाच पद्धतीने सगळ्यांची आकलनशक्ती मोजता येणार नाही. तत्त्वत: ही पद्धत चांगली आहे. परंतु एवढ्या कमी वेळेत अभ्यासक्रमातील हा बदल किती विद्यार्थी स्वीकारतील व आतापर्यंत घोकंपट्टी करून उत्तीर्ण झालेल्या मुलांना पटकन किती आकलन होईल याबद्दल शंका आहे. पहिले दोन-चार महिने विद्यार्थ्यांना या नव्या पद्धतीत रुळण्यात जातील.
सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले की, नव्या अभ्यासपद्धतीनुसार प्रश्नपात्रिका जाऊन कृतीपत्रिका आली आहे. मुलांकडून अभ्यास करून घेताना क्रमिक पुस्तकांचा सराव अधिक करावा लागणार आहे. सारांशमधून मुलांना उत्तरे शोधावी लागतील किंवा त्यावरून प्रश्न तयार करून त्यांची उत्तरे शोधावी लागतील. मुलांना शाळा २० मार्क्स देत होती. ते बंद झाल्याने विद्यार्थ्यांना १०० गुणांचा पेपर लिहून ३५ गुण मिळवून उत्तीर्ण होताना कष्ट घ्यावे लागणार आहेत. या नव्या पध्दतीमुळे त्यांना पाचवीपासूनच मुलांची तयारी करून घ्यावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीत वाढ कशी करावी हे शिक्षकांना पहावे लागेल. शिकवण्याची पद्धत बदलावी लागेल. ही नवी पद्धत अमलात आणताना काय अडचणी येतील ते हळूहळू समजेल. शिक्षक, विद्यार्थ्यांना हा प्रयोग नवीन आहे.
- विवेक पंडित, विद्यानिकेतन
या पद्धतीत एकाच प्रश्नाची दोन-चार उत्तरे देता येऊ शकतात. त्यांची चर्चा वर्गात घडवून आणायला लागेल. या पद्धतीत कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्तीला वाव आहे. विचार करायला प्रवृत्त केले जाणार आहे.
- रेखा पुणतांबेकर, मुख्याध्यापिका
कल्पकतेचा वापर करून पर्यायी ंशब्द शोधून मुलांना जोड्या लावायच्या आहे. त्यामुळे बुद्धीमत्तेनुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध होणार आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे.
- गुलाबराव पाटील, मुख्याध्यापक