भिवंडीतील वीज ग्राहकांसाठी नवे ग्राहक सेवा केंद्र
By नितीन पंडित | Published: October 4, 2022 07:29 PM2022-10-04T19:29:53+5:302022-10-04T19:30:29+5:30
झपाट्याने वाढणाऱ्या निवासी परिसरातील वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी निर्णय
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क: भिवंडी शहरासोबत ग्रामीण भागात वीज वितरण व वीज बिल वसुली करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीने पूर्णा काल्हेर कशेळी राहनाळ या झपाट्याने वाढणाऱ्या निवासी परिसरातील वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी पुर्णा येथे नवीन ग्राहक सेवा केंद्र मंगळवारी सुरू केले. या केंद्राचा शुभारंभ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
काल्हेर, कशेळी, पूर्णा परिसरात सुमारे ६० हजार वीज ग्राहक असून या सेवा केंद्रमुळे वीज ग्राहकांना वीज बिल भरणे, वीजबिलाशी संबंधित समस्या, तक्रारी इत्यादीबाबत सेवा ग्राहकांना देऊन त्याचे निराकरण करता येणार आहे अशी माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदानिया यांनी दिली आहे.
टोरेंट पॉवरने पूर्णा येथील ठाणे जनता सहकारी बँक शेजारी हे ग्राहक सेवा केंद्र सुरू केले असून यापूर्वी पटेल बिल्डिंग, अंजूरफाटा, आर.के.बिझनेस सेंटर, कल्याण नाका, अर्श रेसिडेन्सी, आमपाडा व ग्रीन पार्क रेसिडेन्सी, पडघा अशा ठिकाणी टोरेंट पॉवर कंपनीने वीज ग्राहकांच्या सोयीसाठी ग्राहक सेवा केंद्र सुरू केले आहेत.